

हिरा सरवदे
पुणे : दिवसेंदिवस महाग होत असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार शहरात अनेक ठिकाणी तेजीत सुरू आहे. अधिकृत एजन्सीकडून धायरी फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये चार घरगुती गॅस सिलिंडर जास्त पैसे घेऊन दिल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. असेच प्रकार शहरातील इतरही हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सुरू असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारकडून विविध कंपन्यांद्वारे घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर उपलब्ध करून दिले जातात.
घरगुती सिलिंडरचा रंग लाल, तर व्यावसायिक सिलिंडरचा रंग निळा ठेवण्यात आलेला आहे. सध्या घरगुती सिलिंडर 1150.50 रुपये, तर व्यावसायिक 2194.50 रुपयांना मिळत आहे. व्यावसायिक सिलिंडर घरगुतीपेक्षा तब्बल 1044 रुपयांनी जास्त किमतीला मिळतो. खासगी कंपन्यांच्या सिलिंडरच्या किमती यापेक्षा हजार ते दीड हजारांनी जास्त आहेत. एलपीजी सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत असल्याने घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी वापर वाढलेला आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी नेमलेल्या गॅसपुरवठा एजन्सींकडून हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना चढ्या दराने घरगुती वापराचे सिलिंडर विकले जातात. परिणामी, ऑनलाइन बुकिंग व ऑनलाइन पेमेंट केलेल्यांना 15-20 दिवस सिलिंडर मिळत नाही. व्यावसायिकांना मात्र बुकिंग न करता फोन केल्याबरोबर घरगुती वापराचे सिलिंडर काही मिनिटांत उपलब्ध होते, असा अनेकांचा अनुभव आहे. या काळ्या बाजाराकडे प्रशासन सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.
व्यावसायिक सिलिंडर परवडत नाही
सिलिंडरच्या काळ्या बाजाराबद्दल संबंधितांना विचारणा केल्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे घरगुती सिलिंडरचा वापर करावा लागत असल्याचे हॉटेलमालकाने सांगितले. तर, घरगुती सिलिंडर व्यावसायिकांना साडेबाराशे रुपयांना दिले जाते, असे वितरण करणार्या कर्मचार्याने सांगितले.
एका हॉटेलला दिले चार घरगुती सिलिंडर
धायरी फाटा परिसरातील गोकूळनगर येथे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये धायरी परिसरातील गॅसवितरण एजन्सीच्या वितरकांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चार घरगुती गॅस सिलिंडर आणून दिले व रिकामे सिलिंडर घेऊन गेले.
जास्त उकळले जातात पैसे :
ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी सिलिंडर मिळतो. गॅसचे पैसे रोख दिल्यानंतर वितरण करणार्यांकडून 25 ते 30 रुपये जास्तीचे घेतले जातात. याबाबत कॉल सेंटरला फोन केल्यानंतर घरपोच देण्याचे पैसे आधीच घेतलेले असतात. त्यामुळे जास्तीचा एक रुपयाही देऊ नका, असे सांगितले जाते. मात्र, पैसे द्यायचे नसल्यास ऑफिसला येऊन सिलिंडर घेऊन जा, असे सांगत वितरण करणार्यांकडून सामान्यांची अडवणूक केली जाते.
आम्ही 23 फेब्रुवारी रोजी गॅस बुक केला. त्याचे पैसेही ऑनलाइन भरले. मात्र, अद्याप आम्हाला सिलिंडर मिळालेला नाही. हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना एका फोनवर केव्हाही जागेवर सिलिंडर मिळतो. याकडे पुरवठा अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे तसेच जास्तीचे पैसे घेणार्या एजन्सींवरही कारवाई करावी.
– मंदाकिनी वाघचौरे, गृहिणी
घरगुती गॅस सिलिंडर व्यावसायिक वापरासाठी देता येत नाहीत तसेच गॅस सिलिंडरच्या किमतीमध्येच संबंधित एजन्सीने मोफत घरपोच सेवा देणे अपेक्षित आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर, वितरकांनी जास्त पैसे घेणे, अशा तक्रारी आल्या, तर आम्ही संबंधित कंपनीला तातडीने नोटीस पाठवून अहवाल मागवतो. त्यानुसार आजच्या प्रकारांबाबत संबंधित कंपनीला विचारणा करून कारवाईचा अहवाल मागविला जाईल.
– सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी