पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुणीही नेता गेला तरी नुकसान हे होतेच. किती मोठं नुकसान होईल ते सांगता येत नाही. लोकांना भाजपच्या कार्यशैलीबद्दल चीड आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल. अशोक चव्हाणांचा भाजपप्रवेश जनतेला आवडलेला नाही. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी अमित शहा येणार होते. पण, दौरा रद्द झाला. त्यापूर्वी दिल्लीत प्रवेश होणार होता. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाने जनतेत प्रक्षोभ निर्माण झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी संवाद साधला. अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशावर बोलताना चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यासाठी दोन वर्षांपासून वाटाघाटी सुरू होत्या.
त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपद, असे द्यायचे ठरले. परंतु, त्यास विरोध झाला. परिणामी, राज्यसभेवर त्यांची बोळवण करीत त्यांना महाराष्ट्राबाहेर काढण्यात आले. अशोक चव्हाण यांच्याबरोबर कोण जात आहे? अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र, त्यांचेच पुनर्वसन झाले नाही ते दुसर्यांचे काय संरक्षण करणार? अशी उपहासात्मक टीकाही चव्हाण यांनी केली. संसदेच्या अधिवेशनात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेवर केला आहे. यानंतर दोन दिवसांत हा पक्षप्रवेश झाला. सत्ताधार्यांनी राज्यसभेसाठी जे सहा उमेदवार दिले आहेत, त्यातील तीन माजी काँग्रेसचेच असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा