इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे मराठा समाजाला तातडीने स्वतंत्र व टिकणारे आरक्षण द्यावे. याबाबत निर्णय न घेतल्यास शनिवार, 17 फेब—ुवारीपासून इचलकरंजी शहर व परिसर बंद ठेवण्यासह तीव— आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीत देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शहरातील सकल मराठा समाजाची बुधवारी बैठक पार पडली. अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांपासून पुन्हा जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. इचलकरंजी औद्योगिक शहर आहे. आधीच शहरातील औद्योगिक परिस्थिती बिकट आहे. सर्वसामान्य नागरिक, कामगार यांना त्रास होऊ नये, यासाठी तीव— आंदोलन हाती घेण्यात आलेले नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची चालढकल सुरू असून समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने कायदा करावा, यासाठीचे अधिवेशन लवकरात लवकर घ्यावे, त्रुटी दूर करून कायदा संमत करावा, अशा विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठवावा, यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचेही यावेळी ठरले.
बैठकीस पुंडलिक जाधव, संतोष सावंत, अरविंद माने, वैभव खोंद्रे, शहाजी भोसले, नितीन पाटील, अवधुत मुडशिंगकर, सुरेश कापसे, विकास खोत, विजय मुतालिक, दिलीप पाटील, रामदास टिकले, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.