बारामतीचा गड भेदण्याचे भाजपचे स्वप्न अखेर अधुरेच

बारामतीचा गड भेदण्याचे भाजपचे स्वप्न अखेर अधुरेच
Published on
Updated on

[author title="मनोज आवाळे" image="http://"][/author]

पुणे : गांधी घराण्याचा अमेठीचा गड सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती अशी घोषणा करत सन 2024 च्या निवडणुकीत बारामतीचा गड सर करण्याचे ध्येय ठेवले होते. त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील केली होती. शरद पवार यांचा पक्ष व घर फोडून देखील शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा विजयाचा चौकार भाजपला रोखता आला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती हा गड भेदण्याचे भाजपचे स्वप्न यंदाही अधुरेच राहिले.

२००९ ते २०१४ ची गणितं

भाजपने 2009 च्या निवडणुकीपासून बारामतीत अधिक लक्ष देण्यास सुरवात केली. परंतु, त्यावेळी प्रथमच लोकसभा लढवीत असलेल्या सुळे यांनी भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव केला. सुळे यांना 4, 87, 827 मते मिळाली, तर नलावडे यांना 1, 50, 996 मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे बारामतीची लढत अनपेक्षितरीत्या चुरशीची झाली. परंतु, सुळे यांचा अल्प मतांनी विजय झाला. या निवडणुकीत सुळे यांना 5,21,562 मते मिळाली तर भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविलेल्या रासपच्या महादेव जानकर यांना 4,51,843 मते मिळाली. सुळे या 66, 719 मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीमुळे भाजपला या मतदारसंघातील विजयाबाबत आत्मविश्वास वाटू लागला.

मोदी लाटेत बारामतीचा कौल

सन 2019 च्या निवडणुकीत भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. परंतु, त्यांचा पराभव करत सुळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. सुळे यांना 8,86,714 तर कुल यांना 5,30,940 मते मिळाली. दरम्यान, मोदी लाटेत भाजपने अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला सर केला होता. त्यामुळे शरद पवार यांचा महाराष्ट्रातील बारामती हा अभेद्य गड जिंकण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या. त्यानुसार सन 2022 पासून भाजपने या मतदारसंघात लक्ष देण्यास सुरवात केली.

अजित पवारांच्या बंडामुळे सुळेंना फायदा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, प्रल्हाद पटेल यांनी बारामतीचा दौरा केला. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांचेही मतदारसंघात दौरे वाढले होते. भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. याच दरम्यान, राज्यात अनेक स्थित्यंतरे घडली. 2 जुलै 2023 ला अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. ते त्यांच्या शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले, त्यामुळे बारामतीतील समिकरणे बदलली.

अजित पवार भाजपाबरोबर आल्याने व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता येईल असे आडाखे भाजप नेतृत्वाने बांधले. निवडणुकीच्या सुरवातीलाच एका मंत्र्याने आमचे शरद पवार यांना हरविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. यासाठी बारामतीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली.

बारामती काबीज करण्याचे मनसुबे

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच रणांगणात उतरविण्यात आले. याद्वारे सुळे यांचा पराभव करून शरद पवार यांचा बारामती हा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजप नेतृत्वाने रचले होते. परंतु, सहकार क्षेत्राची ताकद, अनेक बलाढ्य राजकीय नेत्यांचे पाठबळ असूनही सुळे यांचा विजयाचा चौकार रोखता आला नाही. सुनेत्रा पवार यांच्या पराभवाने एकंदरीतच बारामतीचा गड भेदण्याचे भाजपचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news