बारामती बाजार समितीची निवडणूक भाजप लढणार

बारामती बाजार समितीची निवडणूक भाजप लढणार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याची माहिती या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिली. शेतकरी विकास पॅनेल तयार केले जाणार असून, त्या माध्यमातून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले जाणार आहे. बारामतीत भाजप कार्यालयात शनिवारी (दि. 1) यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे, भाजप नेते दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, अ‍ॅड. जी. बी. गावडे, युवराज तावरे आदींची उपस्थिती होती. पदाधिकार्‍यांकडून पत्रकारांना यासंबंधीची माहिती देण्यात आली.

तावरे म्हणाले की, बारामती तालुक्यातील शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरत आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक एकतर्फी होऊ दिली जाणार नाही. केंद्र व राज्य सरकार विविध माध्यमांतून शेतकर्‍यांना न्याय देऊ पाहत आहे. परंतु, बारामतीत एकाच पक्षाकडे समितीची सत्ता असल्याने वाचा फोडायला कोणी तयार नाही. शेतकरी, हमाल मापाडी यांचे प्रश्न कायम आहेत. अनेक घटकांवर अन्याय होतो आहे.

तालुकाध्यक्ष कचरे म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक 'जनशक्ती विरुद्ध धनशक्ती' अशी असेल. राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरून घेताना उमेदवारांसह सूचकांकडूनही विड्रॉवल फॉर्म भरून घेतले आहेत. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही शेतकरी विकास पॅनेल तयार केले आहे. त्या माध्यमातून चुरशीने लढू. राष्ट्रवादीकडून निवडणुकीत पैशाचा वापर होईल. आतापासूनच शेतकरी, हमाल, मापाडी, ग्रामपंचायत सदस्यांवर दबाव आणला जात आहे. परंतु, आम्ही निकराने लढण्याचा निर्धार केला आहे. सोमवारी इच्छुकांचे अर्ज दाखल केले जातील.

बाजार समितीपाठोपाठ तालुका सहकारी दूध संघाची निवडणूक होत आहे. परंतु, येथील नेतृत्वाने तेथे विरोधातील सभासदच ठेवलेला नाही. एकतर विरोधी व्यक्तीला सभासद करून घेतले जात नाही. एखाद्याने चुकीच्या बाबीला विरोध केला, तर त्याचे दूध अडविण्याचे प्रकार घडतात. राष्ट्रवादीला फायदेशीर ठरतील अशांनाच सभासद ठेवले आहे. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीत फारसा वाव नाही.

                                            – रंजनकुमार तावरे,
                     माजी अध्यक्ष, माळेगाव सहकारी साखर कारखाना

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news