

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जेथे भाजप नाही तेथे विकास नाही, याचा अनुभव संपूर्ण देशभरात येत आहे. लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा अवधी असून, जेथे पक्षाचे खासदार नाहीत अशा सर्व मतदार संघांत पक्ष मजबुतीकरण सुरू आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात रेल्वे, विमानतळ, राष्ट्रीय महामार्गसारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे येथे खासदारकीचा उमेदवार कोण असेल हे आता काहीच सांगू शकत नसलो, तरी विकास हवा असेल तर भाजपचा खासदार आवश्यक असल्याचे स्पष्ट संकेत भाजपच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी येथे दिले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मतदार संघनिहाय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह दि. 14 ते 16 सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यावर आल्या आहेत.
बुधवारी (दि. 14) रात्री मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत रेणुका सिंह यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार असेल की शिंदे गटाचा या प्रश्नाचे उत्तर देताना शिरूर मतदार संघात विकास हवा असेल तर भाजपचा खासदार द्यावा लागेल, असे सांगत स्पष्ट संकेत दिले. या वेळी संघटन सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खडारे, आमदार महेश लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेडगे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, अतुल देशमुख, किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, केंद्र शासनाने शेतक-यांच्या सर्व शेती मालाला चांगले दर मिळावे, यासाठी कृषी बिल आणले होते. परंतु देशाच्या हिताचा विचार करून हे बिल मागे घेण्यात आले. परंतु केंद्र शासन कांदा, बटाटा यांसारख्या शेती मालाला चांगले दर कसे मिळतील, याचा केंद्र शासन नक्कीच विचार करेल असे देखील रेणुका सिंह यांनी सांगितले.