पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेली 30 वर्षे भाजपने कसब्यात मतदारसंघाचा विकास केला नाही. कसब्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. त्यांचा तो हक्कही आहे. मला स्वतःला या प्रश्नांची जाणीव असून, कसब्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मी तयार करणार असून, त्या माध्यमातून येथील रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, जुन्या वाड्यांचा प्रश्न, पार्किंग, शाळा, क्रीडांगणे असे प्रश्न सोडविणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक 17 मधील रविवार पेठ, रास्ता पेठ येथील पदयात्रेदरम्यान रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांशी संवाद साधला, या वेळी ते म्हणाले, कसब्यातील विविध नागरी प्रश्नांबरोबरच मतदारसंघातून जाणार्या मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण होणारे प्रश्न या सर्वांवर सविस्तर चर्चा करून उपाय शोधणे व कसब्याच्या विकासाचा स्वतंत्र विकास आराखडा करणे, यासाठी कसबा विकास परिषद आयोजित करून निर्धारित वेळेत कसब्यातील नागरी प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहील.
याचबरोबर या मतदारसंघातील तरुण-तरुणींना चांगला रोजगार मिळेल यासाठी नोकरी महोत्सव आयोजन, बेरोजगार नोंदणी कक्ष स्थापन करणे, बचतगटांची साखळी निर्माण करणे आदींसाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. स्थानिक नगरसेवक, महापालिका व नगररचना अधिकारी, तज्ज्ञ मंडळी, नागरिक यांचा समावेश करून येथील विकासासाठी कसबा विकास पॅकेज राज्य शासनाकडे मागितले जाईल, असे धंगेकर यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.