बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: 'काळ आला होता… पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय आबाटेक (राजुरी, ता. जुन्नर) शिवारातील एका तरुण शेतकर्याला आला. रविवारी (दि. 11) सकाळी गुरगुरत आलेल्या बिबट्याचा त्याच्यावर झडप घालण्याचा अंदाज फसल्याने सुदैवाने या तरुण शेतकर्याचे प्राण बचावले.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, राजुरी (ता. जुन्नर) गावाच्या उत्तरेला आबाटेक शिवारात सुनील बाळेश्वर कणसे हा तरुण रविवारी सकाळी शेळ्या चारत होता. या वेळी दबा धरलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला चढविला. बिबट्याला हुसकावून लावताना बिबट्याने त्याच्यावर झेप घेतली. बिबट्याची झेप सुनीलच्या उजव्या हातावर पडली. मोठ्या धाडसाने सुनील याने बिबट्याला बाजूला फेकत पळ काढल्याने तो बचावला. बिबट्याच्या या हल्ल्यात सुनील कणसे याच्या उजव्या हाताला व पाठीवर जखमा झाल्या आहेत.
त्याला तातडीने उपचारासाठी राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आळे येथील वनपाल साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आले.
येथे रविवारी सायंकाळपर्यंत पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान 15 दिवसांपूर्वीच याच परिसरात शेतक-याच्या चार शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वन विभागाने परिसरात पिंजरे लावावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, माजी सभापती दीपक आवटे यांनी केली आहे.