पुणे : वैद्यकीय योजनेची बिले थकली ; यामुळे महापालिकेचे रुग्ण घेण्यास टाळाटाळ

पुणे : वैद्यकीय योजनेची बिले थकली ; यामुळे महापालिकेचे रुग्ण घेण्यास टाळाटाळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कर्मचार्‍यांसाठीची अंशदायी योजना आणि नागरिकांसाठीच्या शहरी गरीब योजनेचे सुमारे साडेतीन कोटी रुपये थकल्याने एरंडवणा येथील एका रुग्णालयाकडून मागील दोन महिन्यांपासून महापालिकेचे रुग्ण घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरी गरीब योजनेंतर्गत शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. महापालिका सीजीएचएस दरांनुसार या उपचारांचे पैसे रुग्णालयांना देते.

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून एरंडवणा परिसरातील एका रुग्णालयात उपचारांसाठी जाणार्‍या रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाला आल्या आहेत. या तक्रारींनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने संबंधित रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवून रुग्णांवरील उपचार थांबवू नयेत, अशी विनंती केली आहे.

संबंधित रुग्णालयाने 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या 154 जणांवर उपचार केले आहेत. यापैकी अंशदायी योजनेंतर्गत 3 कोटी 2 लाख रुपये आणि शहरी गरीब योजनेंतर्गत 6 कोटी 91 लाख असे एकूण 9 कोटी 93 लाख रुपये बिल झाले आहे. यापैकी डिसेंबर अखेरपर्यंतच्या बिलांचे 6 कोटी 91 लाख रुपये रुग्णालयाला अदा करण्यात आले आहेत. जानेवारी व फेब—ुवारी या महिन्यांतील 41 बिलांचे अंशदायी योजनेतील 1 कोटी 35 लाख आणि शहरी गरीब योजनेतील 2 लाख 29 लाख, असे 3 कोटी 65 लाख रुपये बिल देणे बाकी आहे.

रुग्णालयांची बहुतांश बिले दिली असून, निधी वर्गीकरणामुळे उर्वरित बिले रखडली आहेत. ही बिले तातडीने देण्यात येतील. मात्र, रुग्णालयांनी रुग्णांवरील उपचार थांबवू नयेत, अशी विनंती आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news