मोठी बातमी : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे

मोठी बातमी : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. विनायक काळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये डॉ. काळे यांच्याकडून मुदतीपूर्वीच अधिष्ठातापदाचा भार काढून घेण्यात आला होता. शासनाच्या निर्णयाविरोधात डॉ. काळे अकरा महिन्यांपासून लढा देत होते. या लढ्याला अखेर यश आले असून, डॉ. काळे यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे ससूनचे अधिष्ठातापद सोपवण्यात आले होते. तर, डॉ. काळे यांची मानसिक आरोग्य संस्थेचा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. काळे संचालकपदी रुजू न होता शासनाच्या निर्णयाविरोधात 'महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्यूनल'ने (मॅट) कडे दाद मागितली होती. मॅटने 14 जुलै रोजी डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, डॉ. ठाकूर यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत हायकोर्टाने चार महिन्यांनी निकाल देत डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ससून प्रशासनाचे वाभाडे निघाले.

न्यायालयाच्या निर्णयादिवशी वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. संजीव ठाकूर यांचा पदभार काढून घेतला. ट्रॉमा आयसीयूचे प्रमुख डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता. डॉ. काळे यांना मॅट आणि न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी त्यांच्या नियुक्तीचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचाराधीन होता. डॉ. काळे यांच्याऐवजी मुंबई किंवा नागपूर येथील वरिष्ठ अधिकार्‍याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपवला जाईल, असेही बोलले जात होते. मात्र, बुधवारी रात्री उशिरा
डॉ. विनायक काळे यांची राज्य शासनाने पुनर्नियुक्ती केली. सोमवारी डॉ. काळे पदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news