

ठळक मुद्दे
आश्रमशाळांना कपडे धुण्यासाठी 14 कोटी रूपये खर्च करुन वॉशिंग मशीन देण्यात येणार
विभागात 980 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत
पहिल्या टप्प्यात 585 आश्रमशाळांपैकी 350 आश्रमशाळांना वॉशिंग मशीनचे वितरण
पुणे : राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने राज्यातील 235 खासगी अनुदानित आश्रमशाळांना कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे. त्याबाबत नुकताच निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विभागाने 14 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या या विभागात 980 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत आहेत.
इतर मागासांसह विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना पहिली ते बारावी पर्यत मोफत शिक्षणासह निवास, भोजन आरोग्य सुविधा , शैक्षणिक साहित्य, अंथरून पांघरून , जेवणाची भांडी आदि सुविधा पुरविण्यात येतात. त्यासाठी वेतनेतर अनुदान दिले जाते. या विभागाच्या आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्याच ठिकाणी राहत असतात. आश्रमशाळा सुरू असलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्वत:चे कपडे धुण्यामध्ये खूप मर्यादा येतात. विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता त्यांना कपडे धुण्यासाठी देखील खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यांना अभ्यास करणे, मैदानी खेळण्यास वेळ मिळत नाही. मात्र, कपडे स्वच्छ न केल्यास त्यामध्ये सूक्ष्म जंतु तयार होऊन विद्यार्थ्यांना त्वचेचे विकार होऊ शकतात.
ही बाब लक्षात घेऊन विमुक्त आणि भटक्या जामाती प्रवर्गाच्या निवासी आश्रमशाळामध्ये वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक , माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक असे प्राथमिक एक युनिट विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात 585 आश्रमशाळांपैकी 350 आश्रमशाळांना अत्याधुनिक कपडे वॉशिंग मशीन देण्यात आली आहे आता उर्वरित 235 आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.या मशीनची देखभाल आणि दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबधित मुख्याद्यापक व वसतिगृह अधिक्षक यांच्यावर राहणार आहे.