Teacher shortage : पालघरातील आश्रमशाळा शिक्षकांविना अडचणीत

विद्यार्थ्यांचा आक्रोश, प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप
Teacher shortage
पालघरातील आश्रमशाळा शिक्षकांविना अडचणीतpudhari photo
Published on
Updated on

कासा ः पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये सध्या गंभीर शैक्षणिक संकट निर्माण झाले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणार्‍या कन्या वरवाडा व रणकोळ आश्रमशाळांमध्ये 12वी सायन्स शाखेच्या विद्यार्थिनी शिक्षकांविना अडकल्या आहेत. शाळा सुरु होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरीही सायन्स व इतर विषयांचे शिक्षक अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थिनींनी थेट प्रशासनाला जाब विचारत आपली व्यथा मांडली आहे.

शिक्षक भरतीचा पेच कायम असून त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाविना शिक्षण घेत आहेत. पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास विभागांतर्गत जवळपास 36 निवासी आश्रमशाळा आहेत. यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अनेक आश्रमशाळांमध्ये नियमित शिक्षक नसल्याने शिक्षणाचा दर्जा धोक्यात आला आहे. यातील बहुतांश शिक्षक हे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ रोजंदारीवर शिक्षण देत आहेत. काहींनी 10 ते 15 वर्षे सेवा केली असली तरीही त्यांना अद्यापही कायमसेवा मिळालेली नाही.

यातच आता नव्याने बाह्य स्रोत कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केल्याने सध्याचे रोजंदारी शिक्षक बेरोजगार होण्याच्या भीतीत आहेत. या निर्णयाविरोधात नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयासमोर हजारो रोजंदारी शिक्षकांनी बिर्‍हाड मोर्चा सुरु केला आहे. परिणामी अनेक आश्रमशाळांमध्ये शिक्षकच अनुपस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कन्या वरवाडा आणि रणकोळ आश्रमशाळांतील 12वीच्या विद्यार्थिनींच्या समस्या गंभीर आहेत. सायन्स शाखेचे महत्त्वाचे विषय - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांचे शिक्षक नसल्याने शिकवणी मिळत नाही. बोर्ड परीक्षेचा विचार करता या मुलींना धड मार्गदर्शनही मिळत नाही.

शाळा सुरू होऊन महिना झाला, पण शिक्षकच नाहीत. वर्षातील सगळ्यात महत्वाचा काळ वाया जात आहे. आम्ही मेहनत करायची, पण शिकवणारं कोणी नाही, मग बोर्ड परीक्षेत आम्ही काय लिहायचं? तर आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत निवेदन दिले असूनही अद्याप शिक्षक नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे.

12 वी हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा निर्णायक टप्पा आहे. शिक्षकच नसतील तर आम्ही गप्प बसणार नाही. जर तात्काळ शिक्षक दिले नाहीत, तर ग्रामस्थ आंदोलन छेडतील. शाळा व महाविद्यालयीन शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र शिक्षक न मिळाल्याने हा शिक्षणहक्कच धोक्यात येत आहे.

वेळेत योग्य पावले उचलने गरजेचे आहेत, तर आश्रम शाळेतील विद्यार्थ्याने प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने सायन्स शाखेसह सर्व विषयांचे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, रोजंदारी शिक्षकांच्या नियुक्त्या नियमित कराव्यात, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी विशेष शिकवणी सत्र घ्यावेत अश्या मागण्या केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून कन्या वरवाडा व रणकोळ आश्रमशाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे. अन्यथा या प्रश्नाचा वणवा जिल्हाभर धगधगेल, अशी चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news