

दीपेश सुराणा
पिंपरी : महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने शहरातील विविध सोसायट्यांमध्ये टँकरच्या फेर्या सुरू झाल्या आहेत. वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, ताथवडे, चिखली आदी भागांमध्ये प्रामुख्याने ही समस्या पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे छोट्या सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी मागविण्यासाठी दरमहा 60 हजार रुपये, तर मोठ्या सोसायट्यांना दरमहा 3 लाख रुपये इतक्या खर्चाचा भार पडत आहे.
महापालिकेकडून शहरात सध्या दिवसाआड 510 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जात आहे. तर, एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सध्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्या वाढत असताना पाण्याचा कोटा मात्र अद्याप वाढलेला नाही. आंद्रा धरणातून देण्यात येणार्या अधिकच्या 100 एमएलडी पाण्यासाठी आवश्यक जलशुद्धीकरण केंद्र उभारणी, जलवाहिन्या टाकणे व अन्य कामे अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप हे अधिकचे पाणी शहराला मिळालेले नाही.
कोठे जाणवतेय समस्या ?
वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, ताथवडे आदी भागांतील सोसायट्यांना दिवसाला किमान 5 ते 10 टँकर मागवावे लागत आहे. तर, चिखली परिसरातील सोसायट्यांना दिवसाला 1 ते 2 टँकर इतके पाणी मागवावे लागत आहे. मुख्यत्वे वापरासाठी पाणी कमी पडत असल्याने गेल्या महिनाभरापासून ही समस्या जाणवत आहे. बर्याच सोसायट्यांतील बोअरवेलचे पाणी आटलेले आहे. तर, ज्या सोसायट्यांना बोअरवेलला पाणीच लागलेले नाही, त्यांच्यासमोर टँकर मागविण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
पाण्यासाठी होणारा खर्च अवाढव्य
एका सोसायटीला दररोज 2 टँकर लागत असतील तर त्यांना महिन्याला सरासरी 60 टँकर लागतात. पाण्याचा एक टँकर मागविण्यासाठी सरासरी 800 ते 1200 रुपये मोजावे लागतात. एका टँकरची सरासरी किंमत 1 हजार रुपये पकडल्यास सोसायटीला महिन्याला 60 हजार रुपये इतका खर्च येतो. छोट्या सोसायट्यांतील ही स्थिती झाली. मात्र, मोठ्या सोसायट्यांमध्ये दिवसाला तब्बल 8 ते 10 टँकर लागतात. त्यांना दरमहा येणारा खर्च हा जवळपास 3 लाख इतका आहे.
महापालिकेकडून उपाययोजना काय?
महापालिका प्रशासनाकडून शहरासाठी अधिकचे पाणी मिळावे, यासाठी आंद्रा धरणाचे इंद्रायणी नदीतून 100 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यास शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास हातभार लागेल. पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेकडून जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या टाकल्या जात आहे. त्यामुळे पाणी गळती रोखण्यात यश येत असल्याचे सह-शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.
सोसायट्यांचा नेमका प्रश्न काय?
शहरात विविध भागांमध्ये नागरीकरण झपाट्याने झाले आहे. नवे-नवे गृहप्रकल्प साकारले आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्याची गरजही वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा ठरतो. मात्र, वापरण्याच्या पाण्यासाठी शहराच्या विविध भागातील सोसायट्यांना सध्या टँकर मागवावे लागत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. छोटी सोसायटी असल्यास त्यांना दिवसाला एक ते दोन टँकर लागतात. तर, मोठी सोसायटी असल्यास त्यांना दररोज किमान 5 ते 10 टँकर इतके पाणी लागते.
आमच्या सोसायटीत तीन फेज मिळून पाण्याची मागणी मोठी आहे. दररोज 7 ते 8 टँकर मागवावे लागत आहेत. गेल्या महिनाभरापासून ही परिस्थिती आहे. महापालिकेकडून मिळणारे पाणी मागणीच्या तुलनेत 1/3 पेक्षाही कमी आहे.
– प्रशांत पाटील, उपाध्यक्ष,
संस्कृती सोसायटी (फेज-3), वाकड.वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, ताथवडे भागातील सोसायट्यांमध्ये टँकरच्या फेर्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. सोसायटीच्या मागणीनुसार कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 15 टँकर दररोज मागवावे लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही परिस्थिती आहे. मागणीच्या तुलनेत महापालिकेकडून सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा कमी आहे.
-दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.
चिखली परिसरात सध्या किमान 10 सोसायट्यांमध्ये दररोज दिवसाला 1 ते 2 टँकर मागवावे लागत आहे. जानेवारीच्या मध्यापासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी लवकरात लवकर सुरू झाल्यास पाणीप्रश्न सुटेल.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष,
चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.