

मांजरी: पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने शहरात नव्याने पाच पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून, त्यापैकी मांजरी बुद्रुकमधील नवीन पोलिस ठाण्याचे उद्घाटन बुधवारी (दि. 17) साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
हडपसर-मांजरी परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढता नागरी विस्तार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे हडपसर पोलिस ठाण्यावर मोठा ताण येत होता. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना हडपसर पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मांजरी परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. ती पूर्ण झाल्याने मांजरीकरांनी समाधान व्यक्त केले.
या मागणीची दखल घेत शासनाने मांजरी पोलिस ठाण्याला मान्यता दिली. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने मांजरी पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. या पोलिस ठाण्याचे उद्घाटन नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या हस्ते पार पडले. मांजरी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह पाच अधिकारी आणि सुमारे 60 ते 65 पोलिस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी मांजरी व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून, नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन पोलिस ठाण्यामुळे स्थानिक नागरिकांना तत्काळ पोलिस सेवा मिळणार असून गुन्ह्यांच्या नोंदी, तक्रारी आणि कारवाई अधिक जलद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, काळेपडळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कावळे, मांजरी गावचे पोलिस पाटील अमोल भोसले यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मांजरी पोलिस ठाणे सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास ग््राामस्थांनी व्यक्त केला आहे. या वेळी मांजरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब निकम यांनी मांजरीकरांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली.