भोर: भोर तालुक्यात यंदा खरीप हंगामातील एकूण 17 हजार 624 पैकी 9 हजार 227 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने खरीप हंगामाची पेरणी कमी झाली आहे. यंदा खरीपाला गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पडणार्या सततच्या मोठ्या पावसाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
यंदा खरीप हंगामाची तयारी करण्यापूर्वीच मे महिन्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तो आतापर्यंत सतत पडत आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी करण्यासाठी अनेक शेतकर्यांना शेतात वाफसा येण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेतकर्यांचे नियोजन कोलमडले आहे. आता पावसाने विसावा घेतला तर उरलेल्या पेरण्या होतील, असे सांगितले जात आहे. (Latest Pune News)
मेपासूनच पडणार्या पावसामुळे यंदा भातरोपांची टाकणी करता आली नाही. तर कडधान्य बी-बियाण्यांच्या पेरणीसाठीही अडचणी आल्या. ज्या ठिकाणी भातरोपांची लागवड केली, योग्य रोपे तयार झाली तेथे भात लावणीची कामे सुरू आहेत.
मात्र, अल्पभूधारक शेतकर्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अडचणी ठरणार असल्याचे बोलले जाते. आता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात पेरणीची कामे सुरू झाल्याचे दिसून येते. मात्र, पश्चिम पट्ट्यात भातलावणीची कामे सुरू आहेत.
पेरणी झालेल्या पिकांची आकडेवारी
तालुक्यातील खरीप हंगामातील भात पिकाचे सरासरी 7 हजार 500 हेक्टरपैकी 4 हजार 150 हेक्टरवर लावणी झालेली आहे. नाचणीचे पीक 1 हजार 329 हेक्टरपैकी 936 हेक्टवर घेण्यात आले आहे. सोयाबीनची एकूण 3 हजार 300 हेक्टरपैकी 3 हजार 8 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. भुईमुगाच्या एकूण 2 हजार 400 पैकी 1 हजार 133 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकुण 53 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.
भोरमधील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या माध्यमातून शेतकर्यांना आधार दिला जात आहे. त्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक पद्धतीने भात लागवड व इतर प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शेतकर्यांनी केलेल्या सूचनांनुसार पिकांची काळजी घ्यावी.
- सुरज पाटील, मंडल कृषी अधिकारी, नसरापूर