

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत राजगड कृषी विकास पॅनेलने 14 जागांवर भरघोस मताधिक्य मिळवून राष्ट्रवादी- शिवसेना-भाजप पुरस्कृत संघर्ष परिवर्तन विकास पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव केला. या निकालानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार संग्राम थोपटे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले.
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28) सकाळी 9 ते दुपारी 4 मतदान झाले होते. एकूण मतदान 2 हजार 3 पैकी 1 हजार 967 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. ही टक्केवारी 92.10 अशी आहे. शुक्रवारीच सायंकाळी 6 वाजल्यानंतर शिक्षण भवन येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील, पंढरीनाथ घुगे, संजय पवार यांनी निकाल जाहीर केला.
काँग्रेसपुरस्कृत राजगड कृषी विकास पॅनेलचे 14 उमेदवार विजयी झाले, तर यापूर्वीच याच पॅनेलचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या संघर्ष परिवर्तन विकास पॅनेलच्या उमेदवाराचा मोठ्या मतांच्या फरकाने त्यांनी धुव्वा उडवला.
काँग्रेसपुरस्कृत राजगड कृषी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण सात जागा- आनंदा बाबूराव आंबवले (कर्णावड, 437), धनंजय कृष्णा वाडकर (ससेवाडी, 444), अंकुश पांडुरंग खंडाळे (येवली, 420), राजाराम बाबुराव तुपे (वरवडी बुद्रुक, 452), निलेश बबन सोनवणे (न्हावी, 431), सुरेश राघू राजिवडे (म्हसर बुद्रुक, 434), भाऊ चंदर मळेकर (मळे, 342).
महिला प्रतिनिधी-दोन जागा- अनिता दत्तात्रय गावडे (भोलावडे, 479), सुरेखा रमेश कोंडे (केळवडे, 495), इतर मागास-एक जागा- ईश्वर बबन पांगारे (वेळू, 465). भटके विमुक्त-एक जागा- विठ्ठल धोंडीबा गोरे (डेहन, 461). ग्रामपंचायत सर्वसाधारण-दोन जागा- महेश अशोक धाडवे (सारोळा, 641), प्रवीण विष्णू शिंदे (वेनवडी, 571). आर्थिक दुर्बल घटक-एक जागा- शहाजी दिलीप बोरगे (करंदी खेबा, 551). बिनविरोध निवडून आलेले मतदार संघ- 2 जागा-व्यापारी अडते मतदारसंघ : नवनाथ विठ्ठल भिलारे (किकवी) आणि राजेंद्र दिनकर शेटे (उत्रौली). अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ-एक जागा- दीपक दिनकर गायकवाड (महुडे खुर्द). हमाल व तोलारी मतदारसंघ- विनोद गुलाब खुटवड (नांदगाव).
मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना करून राज्य चालवले. परंतु, शिवसेनेतील काहींनी खंजीर खुपसून भाजपशी आघाडी केली. महाविकास आघाडीची ताकद ही कसबा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून दिसून आली होती. असे असताना देखील भोर मतदारसंघात भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि शिंदे गट एकत्र आले होते. त्यांनी माझ्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मात्र, माझ्या सुज्ञ मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. सर्व मतदारांचे मी आभार मानतो.
– आमदार संग्राम थोपटे, भोर-वेल्हा-मुळशी