भोगीच्या भाज्या महागल्या; भाज्यांच्या खरेदीसाठी गृहिणीवर्गाची बाजारात गर्दी

भोगीच्या भाज्या महागल्या; भाज्यांच्या खरेदीसाठी गृहिणीवर्गाची बाजारात गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणार्‍या भोगीसाठी लागणार्‍या भाज्यांच्या खरेदीसाठी शनिवारी (दि. 13) बाजारात गृहिणींची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये चवळी, पापडी, वांगी, गाजर, वालवर, भुईमूग, मटार, पावटा, कांद्याची पात, मेथी आदी भाज्यांना चांगली मागणी राहिली. परिणामी, किरकोळ बाजारात या भाज्यांच्या भावात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली होती.

भोगीच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या खरेदीसाठी मध्यभागातील महात्मा फुले मंडई, नेहरू चौक, गोविंद हलवाई चौक परिसरात भाजीपाल्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी चवळी, पापडी, वांगी, गाजर, वालवर, भुईमूग, मटार, पावटा, कांद्याची पात, मेथी आदी भाज्यांना मागणी वाढून दरदेखील चांगले मिळतात. त्याअनुषंगाने शेतकरीवर्ग आठ ते दहा दिवस भोगीच्या भाज्यांची तोड राखून ठेवतात. यंदा शनिवारी घाऊक बाजार साप्ताहिक सुटीमुळे बंद असल्याने किरकोळ बाजारातील व्यापार्‍यांनी शुक्रवारी भाज्यांची खरेदी केली. मात्र, बाजारात भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. त्यातुलनेत मागणी जास्त राहिल्याने भाज्यांचे भाव कडाडल्याचे सांगण्यात आले. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर 30 ते 40 रुपये दरम्यान असल्याची माहिती भाजी विक्रेते किरण वणवे यांनी दिली.

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर

 भाज्या          दर (प्रतिकिलो)

  • वालपापडी 120 ते 140 रुपये
  • पापडी 120 ते 140 रुपये
  • वांगी 120 ते 140 रुपये
  • पावटा 120 ते 140 रुपये
  • भुईमूग शेंग 160 ते 200 रुपये
  • मटार 80 ते 100 रुपये
  • गाजर 50 ते 60 रुपये
  • हरभरा गड्डी 25 ते 30 रुपये एक गड्डी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news