वाकड : परिसरात भिंगारे कॉर्नर भागात रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून मागील सात ते आठ महिन्यांपूर्वी रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागील चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे. स्थानिक नागरिकांना आपल्या गाड्या पार्क करण्यासाठी किंवा त्या रस्त्यावरून ये-जा करण्यासाछी खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या निवडणुका होण्यासाठी अजून किती वेळ लागेल माहीत नाही, परंतु महापालिकेच्या प्रशासनाच्या काळात तरी काम लवकर व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची होती. परंतु ही सर्व अपेक्षा फुल ठेवले असून मागील चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला असूनसुद्धा रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे येथे राहणार्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिकेने ताबडतोब रस्त्याची लेवल करावी आणि लवकरात लवकर डांबरीकरण करून होणार्या त्रासातून नागरिकांना मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच, एमएसईबीचा डीपी उघड्या अवस्थेत असून त्याचे झाकण गायब झालेली आहे. अशा परिस्थितीत हे निघालेले झाकण लवकरात लवकर लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. या परिसरामध्ये रस्त्याच्याकडेला लहान मुले खेळताना जर या डीपीला हात लागला तर एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर डीपीला झाकण लावण्याची मागणी केली जात आहे.