

मंचर: भीमाशंकर मंदिर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असल्याने स्थानिक आदिवासींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कुंभमेळा व पर्यावरण संरक्षणाच्या कारणावरून परिसरातील नागरिकांना इतरत्र हलवण्याचा प्रयत्न होत असून, त्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मंदिर परिसरात गाडीवाले, गाईड, डोलीवाले, बेलफूल विक्रेते, गंध लावणारे, तसेच छोटे दुकानदार आणि कचरा गोळा करणारे असे शेकडो आदिवासी तरुण-महिला विविध व्यवसायांद्वारे उपजीविका करतात. प्रस्तावित स्थलांतरामुळे त्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. भीमाशंकर विकास आराखडा तयार करताना आदिवासी समाजाला केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या आराखड्यात त्यांचे अस्तित्व दिसत नसल्याची टीका होत आहे.
गावठाणातील घरांची नोंद ग््राामपंचायतीकडे असल्याने त्या नागरिकांना पर्यायी घरे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मंदिर परिसरातील बेलफूल विक्रेते, टपरीवाले, गाईड, डोलीवाले, गाडीवाले आणि गंध लावणारे अशा अनेक दुकानदारांच्या नोंदी अद्याप अधिकृतपणे झालेल्या नसल्याने त्यांना भविष्यात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नव्याने उभ्या राहणाऱ्या व्यवस्थेत बाहेरील आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. ही मंडळी आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे विकास आराखडा तयार करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील गावठाण स्थलांतराबाबत गुरुवारी (दि. 19) गावची बैठक मंदिराजवळ होणार आहे. त्यामध्ये ग््राामस्थांच्या, दुकानदारांच्या भावना समजावून घेऊन त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तसेच येथील गावठाणाची तसेच दुकानदारांची पूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांना सादर केलेली आहे. त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, यासाठी काळजी घेतली जाईल.
दत्तात्रय हिले, सरपंच भीमाशंकर
श्रीक्षेत्र भीमाशंकर गावठाण स्थलांतर करताना येथील नागरिक आणि दुकानदारांच्या भविष्याचा विचार प्रशासनाने विचार करावा. सध्या मंदिर बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी झाली आहे. त्यातच स्थलांतर होणार असल्यामुळे आणखी बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, याचाही विचार प्रशासनाने करावा.
मारुती लोहोकरे, आदिवासी नेते
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्या रोजगारांचे काय? त्यामुळे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन आदिवासी बांधवांना न्याय द्यावा.
संजय गवारी, माजी सभापती, पंचायत समिती आंबेगाव