

मंचर: बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील देवढाबा येथून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी येणार्या भाविकांच्या पिकअप गाडीचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात 17 जण जखमी झाले. ही दुर्घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता घडली.
जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील देवढाबा येथून 21 भाविक रविवारी (दि. 31 ऑगस्ट) पिकअप जीपने देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी वणी, नाशिक, शिर्डी, शनि शिंगणापूर, जेजुरी, आळंदी येथील देवदर्शन केले. (Latest Pune News)
त्यानंतर बुधवारी (दि. 3) ते श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जात होते. या वेळी पोखरी गावाजवळील शेंदर्याच लवणवस्ती रस्त्यावर पिकअप जीपचा ब्रेक निकामी झाला त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप वळणावर पलटी झाली.
या अपघातात सुनीता संदीप कवळे (वय 40), ज्योती गणेश कवळे (वय 38), कल्पना विजय कवळे (वय 45), शोभा श्रावण बोरसे (वय 55), पिकअप चालक प्रभाकर सुधाकर बोरसे (वय 24), सूर्यकांत डवले (वय 45), ज्ञानेश्वर सपकाळ (वय 65), आविष गणेश कवळे (वय 12), शारदा भास्कर जांभे (वय 40), मुक्ताबाई साबळे (वय 55), उषा सूर्यकांत डवले (वय 44), ज्ञानेश्वर सपकाळ (वय 65), सूर्यकांत दगडू डवले (वय 45), निर्मला भागवत बोरसे (वय 60), सुनिता संजय सपकाळ (वय 47), शारदाबाई भास्कर जांबे (वय 50) आणि मंदाबाई सुपदा फदले (वय 50) हे जखमी झाले आहेत.
जखमींना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिकअप जीपमध्ये एकूण 21 भाविक होते, त्यापैकी 17 जण जखमी झाले. उर्वरित 4 जणांना कोणतीही इजा झालेली नाही. सुदैवाने जीवितहानी टळली.
डॉक्टरांनी केली जखमींच्या जेवणाची सोय
जखमी भाविक हे सर्वसामान्य कुटुंबातील होते. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. जखमींच्या जेवणाची सोय उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राहुल खेमणार आणि त्यांच्या सहकार्यांची केल्याचे डॉ. विवेकानंद फसाले यांनी सांगितले.