बावडा: उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. उजनीतून सोडण्यात येणार्या पाण्याचा विसर्ग शनिवारी (दि. 21) सायंकाळी 6 वाजता तब्बल 21,600 क्युसेक एवढा होता. त्यामुळे प्रशासनाने इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात शनिवारी सकाळी 16,600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दुपारी 3 वाजता त्यात वाढ करून विसर्ग 21,600 क्युसेक करण्यात आला. उजनी धरणामध्ये शनिवारी सायंकाळी 6 वाजता 104.25 टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 40.59 टीएमसी एवढा आहे. (Latest Pune News)
त्यामुळे धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 75.77 टक्के एवढा झाला आहे. धरणातून बोगद्यामध्ये 200 क्युसेक, कालव्यातून 500 क्युसेक, तर धरणाच्या सांडव्यातून तब्बल 20 हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत असलेले 1600 क्युसेक पाणी हे नदीपात्रात येत आहे. त्यामुळे नदीपात्रात येणार्या पाण्याचा एकूण विसर्ग 21 हजार 600 एवढा झाला आहे.
आषाढीमुळे पूरनियंत्रण
सध्या दौंड येथून उजनी धरणामध्ये येणार्या पाण्याचा विसर्ग 27,456 क्युसेक होता. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, दुसर्या बाजूला निरा नदीच्या धरणसाखळीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंढरपूर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण नाही, यासाठी काटेकोर नियोजन करावे लागत आहे.