नानगाव : जोरदार पावसामुळे भीमेला पूर

 पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील पाण्याखाली गेलेला बंधारा. (छाया : राजेंद्र खोमणे)
पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील पाण्याखाली गेलेला बंधारा. (छाया : राजेंद्र खोमणे)
Published on: 
Updated on: 

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील धरणक्षेत्रात व डोंगर भागात गेली काही दिवसांपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. नदीपात्र काठोकाठ भरून वाहत असून, नदीकाठच्या शेतात देखील पाणी शिरले आहे. वाढलेल्या या पाण्यामुळे शेतकर्‍यांची मोठी धावपळ झाल्याने विद्युत मोटारींचे देखील नुकसान झाल्याची वस्तुस्थिती आहे.
भीमा नदीपात्रातील वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठची शेतजमीन व शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

तसेच, नदीकाठचे विद्युत खांब देखील पाण्याखाली गेले आहेत. रात्री वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे शेतकर्‍यांची मोठी धांदलच उडाली. पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या काही विद्युत मोटारी पाण्याखाली गेल्या असून, काही शेतकरी मोटारी बाहेर काढण्यास यशस्वी झाले. मात्र, विद्युत मोटारी पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतातील उसाचे पीक, जनावरांचा चारा, भाजीपाला, फळभाज्या व इतर पिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

नानगाव (ता. दौंड) येथील वडगाव-नानगाव नदीवरील पुलाला खालच्या बाजूला पाणी जोरदार वेगाने वाहत आहे, तसेच पारगाव सा. मा. येथील बंधार्‍यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून, बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे आलेल्या पाण्यात मोठा कचरा देखील वाहून येत आहे. डोंगर भागात आणि धरणक्षेत्रात अजूनही पावसाची परिस्थिती असल्याने नदीपात्राच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.