देऊळगाव राजे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे भीमा नदी खळाळून वाहत आहे. दौंड येथून शनिवारी (दि. 17) दुपारी चार वाजता तब्बल 1 लाख 41 हजार 822 क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. खोरवडी, पेडगाव व देऊळगाव राजे येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सिद्धटेक (गणपती) येथील पूलदेखील पाण्याखाली गेल्याने संध्याकाळी पुलावरील वाहतूक बंद झाली होती.
देऊळगाव बंधार्यावरून श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेट या ठिकाणी जाता येते. या भागाला दोन्ही बाजूने नदीचा वेढा आहे. परंतु, बंधार्यावरून पाणी वाहत असल्याने या भागाचा शनिवारी सकाळपासून संपर्क तुटला आहे. असे असले तरी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या पुरामुळे नदीकाठच्या सखल जमिनीत पाणी गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पाण्यामुळे अनेक शेतकर्यांचे विद्युत पंप पाण्यात बुडून नुकसान झाले आहे. मात्र, सुखद बाब म्हणजे परिसराला वरदान असलेले उजनी धरण सध्या 100 टक्के भरल्याने शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. एकूणच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत असली, तरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.