

Bhigwan Girl Kidnapping: दुचाकीवरून निघालेल्या मुलीसह आई व भावाच्या डोळ्यांत लाल मिरचीची पूड टाकून २१ वर्षीय मुलीचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. भिगवण (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या गंभीर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात झहीर हरुण शेख व आयान हरुण शेख (शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड) या दोन सख्या भावांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर भिगवण व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे विभागीय पोलिस बापूराव दडस, बारामतीचे सुदर्शन राठोड यांनी भिगवण येथे भेट दिली. दोन्ही आरोपींच्या शोधार्थ तातडीने तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच, जिल्हा व टोल नाक्यावर जागोजागी नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक बिरादार, भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
भिगवण परिसरातील अपहरण झालेली मुलगी ही आपल्या आई व भावासह दुचाकीवरून भिगवण येथे निघाली होती. त्या वेळी वरील संशयित आरोपींनी त्यांची दुचाकी अडवून तिघांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. त्यानंतर त्यांनी मुलीचे अपहरण करून पळ काढला आहे.
या घटनेची माहिती मिळताच भिगवण व परिसरातील नागरिक तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भिगवण पोलिस ठाण्याच्या परिसरात जमा झाले होते. त्यामुळे मोठा बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे. भिगवण भागात सातत्याने असे प्रकार घडू लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भिगवण बंदची हाक देण्यात आली. सकाळपासूनच भिगवणमधील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने, व्यावसायिक कार्यालये आणि व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंदला पाठिंबा दिला. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता, तर व्यापारी संकुलांमध्ये शांतता पसरली होती.
अपहरणाच्या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दुपारी तीन वाजता भव्य “हिंदू जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून, ज्या बाजारपेठेतील परिसरातून मुलीचे अपहरण झाले, त्याच मार्गावरून मोर्चा काढण्यात येणार आहे.
यातच गोपीचंद पडळकरांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, भिगवण येथे त्यांची जाहीर सभा होणार होती, मात्र दोन्ही समाजात तणाव निर्माण होऊ नये आणि उद्या शिवजयंती आहे, या कारणामुळे सभेला परवानगी देण्यात आली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.