Solar project in Bhandgaon
खोर: दौंड तालुक्यातील भांडगाव हे संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरणारे पहिले सौर ऊर्जा स्वावलंबी गाव ठरले आहे. कर्तव्य फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून ’माझा ध्यास-माझे भांडगाव-सौर ऊर्जेचे गाव’ या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात आले.
गावातील 77 कुटुंबांना कोणताही आर्थिक भार न पडता त्यांच्या घरांवर अंदाजे 71 हजार रुपये किंमतीचा सौर प्रकल्प मोफत बसवला. यामुळे दरमहा सुमारे 1 हजार रुपयांची वीजबचत होत असून, पुढील 20 वर्षे वीजबिलाची चिंता राहिली नाही. (Latest Pune News)
या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यावर पूर्वी भरलेले 30 हजार रुपये परत मिळाले असून त्यावर अतिरिक्त 2 हजार 400 रुपयेही जमा करण्यात आले. अनेक कुटुंबांनी हा अधिकचा परतावा पुन्हा कर्तव्य फाउंडेशनला देणगी स्वरूपात प्रदान करून पुढच्या टप्प्यातील कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
गावातील शेखर नंदकुमार दोरगे यांच्या घराचे जून 2025 चे वीजबिल अवघे 10 रुपये, तर संदीप कवित्के, सोमनाथ हरपळे, रामदास तांबे, रमेश पांचंग्रे, रोहिदास भगत, बाबूराव गुलदगड यांचे वीजबिल शून्य रुपये आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक आणि कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक श्याम कापरे म्हणाले, ’ही केवळ एक योजना नसून, सौर ऊर्जेच्या स्वावलंबनाची चळवळ आहे.
हे यश गावकर्यांच्या एकजूट आणि विश्वासामुळेच शक्य झाले. भविष्यात आणखी 50 कुटुंबांसाठी सौर प्रकल्प देण्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत, युवा सहकारी यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून अधिकाधिक कुटुंबांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.