पिंपरी : भामा आसखेड पाणी योजनेवरून कलगीतुरा

पिंपरी : भामा आसखेड  पाणी योजनेवरून कलगीतुरा

मिलिंद कांबळे

पिंपरी : येणार येणार म्हणून भामा आसखेड पाणी योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली. आता त्या निविदेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशसानाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष भाजपला टार्गेट केले आहे. या योजनेवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडत आहे. त्यामुळे शहराला गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. ही महापालिकेची नामुष्की आहे.

शहराला अतिरिक्त 267 एमएलडी पाणी मिळावे म्हणून आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन आहे. भासा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशन, वीजपुरवठा कामांची निविदा पाणीपुरवठा विभागाने नुकतीच पूर्ण केली. त्या कामासाठी मुदतवाढ देऊनही दोनच कंपन्यांनी निविदा भरल्या. मूळ 121 कोटींची निविदा वाढीव दराने थेट 167 कोटींवर गेली. पालिका प्रशासनाने दर कमी करण्याची विनंती केल्यावर ती 151 कोटींपर्यंत खाली आली. मूळ खर्चापेक्षा 30 कोटी रुपये जादा दराने हे काम केले जाणार आहे.

निविदाप्रक्रिया व मर्जीतील ठराविक ठेकेदाराला काम देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनला भ्रष्टाचारावरून टार्गेट केले आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अधिकारी व ठेकेदारांशी संगनमत करून 30 कोटी वाढीव दराने काम करण्याचा घाट घातला असून, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला. तसेच, मनसेने ही या वाढीव दराची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढण्याची मागणी केली आहे.

तर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थापत्य व विद्युत कामांची एकत्रित निविदा काढून प्रशासनाने चूक केल्याचा आरोप केला आहे. त्यातही ठराविक ठेकेदाराला काम देण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप दिसत असून, त्याना 30 कोटी वाढीव दराने काम मंजुर करण्यात आले आहे. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. आरोप प्रत्यारोपावरून हे प्रकरण अधिक गाजत आहे. त्यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे बोलत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

योजना लांबल्यास पाणी उशिरा मिळणार
शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेड योजनेतील अतिरिक्त 267 एमएलडी पाणी अत्यावश्यक आहे. ते पाणी मिळाल्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. आता, काम सुरू झाल्यास किमान तीन वषार्ंत काम पूर्ण होऊ शकते. निविदाप्रक्रिया रद्द करून पुन्हा राबविल्यास किमान 3 ते 5 महिन्यांचा कालावधी जाणार आहे. परिणामी, शहराला पाणी मिळण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एकनाथ पवार यांनी संन्यास घ्यावा
भामा आसखेड जॅकवेलच्या निविदेत तब्बल 30 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे पाप भाजपने केले आहे. भ्रष्टाचारर उघडकीस आणल्यानंतर राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा करणारे भाजपचे प्रवक्ते एकनाथ पवार हे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने उघडे पडले आहेत. 'खोटे बोल पण रेटून बोल' या पद्धतीचा अवलंब करणार्‍या पवारांना त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने तोंडावर पाडले आहे. आ. जगताप यांनी त्या भ्रष्टाचारावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे पवार यांनी राजकारणातून संन्यास कधी घेणार आहेत, त्याची तारीख जाहीर करावी, असे आव्हान माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news