पिंपरी: भुयारी मार्गाच्या संथगती कामामुळे दुर्घटना; पालिका, ठेकेदारांवर कारवाईची तक्रार

पिंपरी: भुयारी मार्गाच्या संथगती कामामुळे दुर्घटना; पालिका, ठेकेदारांवर कारवाईची तक्रार
Published on
Updated on

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाण पूल आणि मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या मध्यावर पादचार्‍यांसाठी भुयारी मार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. या मार्गावर दिशादर्शक व सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. वेगात आलेल्या जडवाहनांना अचानक वळण घ्यावे लागत असल्याने वाहनांवर नियंत्रण राहत नाही. या कारणांमुळे गॅसने भरलेला टँकर पलटी होऊन दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची तक्रार करण्यात आली आहे.

भुयारी मार्गाचे काम मुदत संपली तरी, संथ गतीने सुरू आहे. काम सुरू असताना भुयारी मार्गाच्या स्लॅबवरून धोकादायकरित्या वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. पुलावरून वाहन खाली आल्यानंतर गतिरोधक लावले आहेत. वेगात आलेले वाहन त्यावर आपटते. त्यानंतर लगेच भुयारी मार्गावर वळण देण्यात आले आहे. त्यासंदर्भात दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. ग्रेडसेपरेटर मार्गावर अचानक वळण आल्याने संभ्रम निर्माण होऊन वाहनचालकांचे विशेषत: अवजड वाहनचालकांचे नियंत्रण सुटते आणि अपघात होत आहेत, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. गॅस टँकर पलटण्याचा प्रकार याच कारणामुळे घडला आहे. अशा प्रकारे दुर्घटना घडू नये म्हणून दक्षता घेऊन महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

सुरक्षित रहदारीसाठी सर्व उपाययोजना

वाहतूक पोलिस केवळ 25 टक्के रस्ता बंद करण्यास परवानगी देत आहेत. त्यानुसार, काम केले जात आहे. कामास विलंब झाल्याने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे प्रस्तावित आहे. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. त्या दिवशी तब्बल 200 गॅस टँकर या मार्गावरून गेले. एकाच टँकरचा अपघात झाला, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संतोष कुदळे यांनी सांगितले.

दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा

गॅस टँकर पलटण्याचा प्रकार महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. हलगर्जीपणे काम करणार्‍या पालिकेच्या स्थापत्य विभागाचे अधिकारी, सल्लागार आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करावी. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

मुदत संपली तरी काम सुरूच

निगडी उड्डाण पूल ते भक्ती-शक्ती समूह शिल्प उड्डाण पूल या दरम्यान पादचार्‍यांना रस्ता ओलंडण्यासाठी सुरक्षित मार्ग नाही. त्यामुळे साडेचार कोटी खर्च करून भुयारी मार्ग बनविण्यात येत आहे. त्या कामास ठेकेदार बी. के. खोसे कंपनीने 9 मार्च 2022 ला सुरुवात केली. कामाची 15 महिन्यांची मुदत 8 जून 2023 ला संपली. या कामासाठी वारंवार रस्ता अडविला जात असल्याने ग्रेडसेपरेटर मार्गावरील वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी वाहतूक संथ होत असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.

भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. ते योग्यरित्या बसवलेले नाहीत. त्यांची उंची अधिक आहे. त्यामुळे उतारावर वाहने आदळतात. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. भुयारी मार्गाच्या कामास गती देऊन ते प्राधान्याने पूर्ण केले जावे.
– सचिन चिखले, माजी नगरसेवक

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news