कार्ला : एकवीरा देवीच्या माहेरघरात रंगला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा

कार्ला : एकवीरा देवीच्या माहेरघरात रंगला भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा
Published on
Updated on

कार्ला : महाराष्ट्रातील कोळी व आगरीबांधवाचे कुलदैवत असणार्‍या एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला सोमवारी संध्याकाळी माहेरघर असणार्‍या देवघर येथून सुरुवात झाली. पारंपरिक पध्दतीने देवीचे बंधू काळभैरवनाथ पालखी उत्साहात काढण्यात आली.

कोकणातून पालख्या देवघर
देवघर येथील श्री काळभैरवनाथ ट्रस्ट, मंदिर जीर्णोध्दार समिती देवघर व ग्रामस्थ यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी चैत्र षष्ठीला देवघर येथे एकवीरादेवीचा भाऊ काळभैरवनाथ पालखी सोहळा पार पडत असतो. कोकण भागातून येणार्‍या देवीच्या पालख्या देवघर येथे मुख्य गडावर जाण्यापूर्वी काळभैरवनाथ मंदिरात आल्या होत्या व आई एकवीरा व काळभैरवनाथ यांची भेट घडवत मंदिराला प्रदक्षिणा घालून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

तेलवानाचा कार्यक्रम उद्या
हजारोच्या संख्येने कोळीबांधवांनी मिरवणुकीत सहभागी होऊन काळभैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले. श्री काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने सकाळी काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक करत मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. 28 मार्च रोजी चैत्र शुध्द सप्तमीला सायंकाळी सात वाजता मुख्य यात्रा म्हणजे श्री आई एकवीरादेवीचा पालखी सोहळा तर 29 मार्च रोजी पहाटे तेलवानाचा कार्यक्रम मांगल्यपूर्ण वातावरणात होणार आहे.

या काळात वेहरगावात एकवीरा मंदिरात येणार्‍या भाविकांना योग्य प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी तहसीलदार मधुसूधन बर्गे, लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, सरपंच व विश्वस्त अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर, सागर देवकर, विकास पडवळ, महेंद्र देशमुख, मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी मीरा बोर्‍हाडे, वनविभाग अधिकारी प्रमोद रासकर, एकवीरा देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलिस पाटील अनिल पडवळ उपस्थित होते.

यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मावळ प्रशासन व पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या वेळी यात्राकाळात कार्ला परिसरातील गावात तीन दिवस पूर्णपणे दारूबंदी तसेच डीजे वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गडावर चोख पोलिस बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी व यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकरी सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह 4 पोलिस निरीक्षक, 30 सहायक पोलिस निरीक्षक, 350 पोलिस कर्मचारी, होमगार्ड, शीघ्र पोलिस दल तुकड्या, स्ट्रायकिंग पथक व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तैनात करण्यात आले आहेत.

यात्राकाळात पशुहत्या बंदी
यात्राकाळात पशुहत्या बंदी घालण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, याठिकाणी शासकीय विभागाचे एक एक अधिकरी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. संपर्कासाठी इंटरकॉम सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, डॉक्टरांचे सेवा पथक, पायर्‍या दुरुस्ती, सुलभ शौचालयात पाण्याची व्यवस्था, पार्किंगसाठी राखीव जागा, भक्तासांठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news