

Pune News Today: देशासह सर्वच नागरिकांची कामे आता मोबाईलशिवाय होऊच शकत नाहीत, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे आणि याच मोबाईलचा वापर जास्त झाला तर बॅटरी उतरण्याची समस्या ही येतेच, याकरिता मोबाईल पावर बँक हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे बाहेरगावी प्रवासाला निघाले की, अनेकजण आपल्यासोबत मोबाईल पावर बँक घेऊन जातात.
मात्र, विमानाने प्रवास करणार असाल, तर ही पावर बँक घेऊन जाण्याचे नियम आहेत, त्याचे पालन केले नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून नागरिकांनी विमान प्रवास करताना या नियमांचे पालन करावे, असे आवाहन विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या आणि हवाई वाहतूक तज्ज्ञांनी केले आहे.
... असे आहेत नियम
प्रवाशांना पावर बँक हे एअरलाइन्सच्या चेक- इन सामानातून घेऊन जाण्यास बंदी आहे. पॉवर बँक हे प्रवासी आपल्या हॅन्ड बॅगेजमधूनच घेऊन जाऊ शकतात. याचे कारण म्हणजे चेक- इन सामानात पावर बँक ठेवली असल्यास सामान ट्रॉली किंवा विमानात चढवताना व उतरवताना जर चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले किंवा पडल्यामुळे अथवा आदळ-आपट झाल्यामुळे हानी झाल्यास पावर बँकचे तापमान वाढून आग लागण्याची शक्यता असते.
हवाई प्रवाशांना साधारण 100 वॅट अवर क्षमतेच्या दोन पावर बँक घेऊन जाण्याची परवानगी असते. 100 ते 160 वॅट अवर क्षमतेचे पावर बँक एअरलाइनच्या पूर्व परवानगीनेच नेता येऊ शकतात. 160 च्यावर वॅट अवर क्षमतेचे पॉवर बँक एअरलाइन्सने विमानातून घेऊन जाण्याची परवानगी नसते.
विमान प्रवासात पावर बँक घेऊन जायच्या आधी प्रवाशांनी या विषयीच्या नियमांची एअरलाइन्सकडून खातरजमा करूनच नियमानुसार ते घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवाशांनी ओरिजनल कंपनीच्या व चांगल्या स्थितीत असलेल्याच पावर बँक विमान प्रवासात बरोबर घेतल्या पाहिजेत. डॅमेज झालेले किंवा ओवर चार्जिंग, शॉर्टसर्किट इत्यादींमुळे पावर बँक जास्त गरम होण्यापासून प्रतिबंध करणारी अंगभूत सुरक्षा फीचर्स नसलेले पॉवर बँक प्रवासात घेऊन जाऊ नये.
पुणे विमानतळावरील स्थिती
रोजची पुण्यातून होणारी उड्डाणे - 80 ते 90
पुण्यात उतरणारी रोजची विमाने - 80 ते 90
पुण्यातून दररोज प्रवास करणारे प्रवासी संख्या - 25 ते 30 हजार
विमान प्रवास करताना मोबाईलच्या पावर बँकबाबत विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांनी काही नियम आखून दिले आहेत. हे नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत. त्याचे पालन विमान प्रवास करणार्या प्रत्येकाने केले पाहिजे. अन्यथा, विमान प्रवासादरम्यान अपघात होण्याची शक्यता आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ