सावधान! कोकणात ‘या’ महिन्यात महापुराची शक्यता; राज्यात सरासरी 99 टक्के पाऊस

Weather Forecast
Weather Forecast

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सून नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरा म्हणजे 7 ते 8 जून रोजी येईल. त्यापुढे तो राज्यात 12 ते 17 जूनदरम्यान येईल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 99 टक्के पाऊस होईल. यंदा कोकणात 103 टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल. तेथे ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे, असा अंदाज शहरातील ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. डॉ. साबळे यांनी तयार केलेल्या साबळे मॉडेलच्या सहाय्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. गत 22 वर्षांपासून ते मान्सूनचा स्वतंत्र अंदाज देत आहेत. त्यांनी सांगितले की, यंदा मान्सून मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात खूप चांगला बरसेल.

मात्र, जूनचा पहिला पाऊस जोरदार पडल्यावर काही भागात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल. ऑगस्टमध्ये कोकणात महापुराची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने खबरदारी घ्यावी, असाही इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत डॉ. साबळे यांनी सापेक्ष आर्द्रता, वार्‍याची दिशा, ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यावर हा अंदाज मांडला.

विभागवार अंदाज (टक्के)

  • कोकण : 103 ते 106
  • पश्चिम महाराष्ट्र : 97 ते 100
  • विदर्भ : 98 ते 103
  • मराठवाडा : 97
  • उत्तर महाराष्ट्र : 98

महत्त्वाची निरीक्षणे

जून व जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे मोठे पावसाचे खंड पडण्याची शक्यता आहे. कारण,
या भागात वा-याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तापमान कमी आढळले. दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव आणि परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. कमी दिवसांत जास्त पाऊस आणि काही काळ मोठे खंड असा पॅटर्न राहील.

यंदा ईशान्य भारतात रेमल चक्रीवादळामुळे मान्सून तिकडे लवकर गेला. मात्र, केरळ शाखेकडून येणारा मान्सून सध्या किंचित अडखळल्याने तो तळकोकणात 5 जून ऐवजी 7 ते 8 जून रोजी येईल, असा अंदाज वाटतो. त्यापुढे 9 व 10 रोजी मुंबई, पुणे शहरात आणि त्या पुढे 12 ते 17 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र पुढे जाईल. मागच्या वर्षीइतका तो केरळात अडकणार नाही. कारण, राज्यात हवेचे दाब सध्या 1006 हेक्टा पास्कल इतके आहेत. ते 1004 वर जाताच मान्सून पुढे सरकेल.

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news