मंचर : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बुद्रुक) यांचा सन 2022/23 करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा 'उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार 2022/23 व मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा 'तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार' जाहीर झाला आहे. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
राज्यातील 2022/23 च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणार्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत देण्यात येणार्या पुरस्कारांची शुक्रवारी (दि. 5) घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (दि. 11) सकाळी साडेदहा वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्काराबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष बेंडे म्हणाले, राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळते भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार 2022/23 साठी कारखान्याची निवड झाली आहे.
मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणार्या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर, साखर उत्पादन प्रक्रियेमध्ये बगॅस वापर कमी आहे. गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत, साखरेच्या व्ययामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कारखान्याचे संस्थापक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच हा पुरस्कार मिळणे शक्य झाले. कारखान्यास देश पातळीवरील 12 व राज्य पातळीवरील 14 असे एकूण 26 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार 5 वेळा प्राप्त करणारा भीमाशंकर हा एकमेव कारखाना ठरला असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा