पुढारी ऑनलाईन डेस्क: काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली. यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी रोहित पवार यांना साथ देत, या कारवाईवरून सत्ताधारी सरकारवर हल्ला चढवला. यानंतर रोहित पवार यांनी साथ दिलेल्यांचे आभार मानले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Rohit Pawar)
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, यापुढेही आपण द्वेषाच्या राजकारणाला उखडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी एकजुटीने लढत राहू आणि सरकारलाही मुद्द्यावर बोलायला भाग पाडू, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Rohit Pawar)
माझ्या कंपनीवरील व पर्यायाने माझ्यावरील कारवाईचा राज्यभरातून सामान्य लोकांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच निषेध केला. कर्जतमध्ये नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांनी बंद पाळला तर अनेकांनी फोन करून आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला. या सर्वांचे मनापासून आभार! असेही रोहीत पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी (दि. ५) सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले. या कंपनीच्या कार्यालयात अन्य लोकांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांची ही कंपनी आहे. अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पवार कुटुंबात उभी फूट पडली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय व राज्यातील यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.