पुणे : ओढ्यांची, उपचार्‍यांची कामे जलदगतीने पूर्ण

पुणे : ओढ्यांची, उपचार्‍यांची कामे जलदगतीने पूर्ण

माळेगाव (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  माळेगाव नगरपंचायत हद्दीतील मुख्य ओढ्याची व उप चार्‍यांची कामे विशेष दुरुस्तीअंतर्गत मार्गी लागली आहेत. पावसाळ्यापूर्वी ओढ्यामधील गाळ व झाडे-झुडपे काढून साफसफाई करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह आता सुरळीत राहाणार असल्याची माहिती पाटबंधारे संशोधन जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्रीरंग श. खाडे व कनिष्ठ अभियंता संतोष वनवे यांनी दिली. दरम्यान, या ओढ्याच्या दुरुस्तीचा फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या दोन वर्षांपासून माळेगाव नगरपंचायत हद्दीतील ओढे व चार्‍यांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे ओढा व चार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली होती. गाळ साचल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता. तसेच परिसरात दुर्गंधी पसरली होती. ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी. जेणेकरून पाण्याचा प्रवाह सुरळीत राहील व नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार नाही यासाठी नगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी स्मिता काळे यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रि.सु.लांजेकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला. विशेष दुरुस्तीअंतर्गत माळेगावातील मुख्य ओढे व उप चार्‍यांमधील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात आला. झाडे-झुडपे काढून साफसफाई करण्यात आली.

माळेगाव नगरपंचायत हद्दीतील ओढ्याची साफसफाई करून ओढे स्वच्छ केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ओढ्यात केरकचरा टाकून नये. परिसरातील चार्‍या स्वच्छ राहतील याची काळजी घ्यावी.
                                      – स्मिता काळे, मुख्याधिकारी, माळेगाव नगरपंचायत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news