

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव बस स्थानकाशेजारील जुन्नरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढताना पक्के बांधकाम तुटणार नाही या बाबतची खबरदारी घ्या, अशी सूचना आ. अतुल बेनके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नारायणगाव येथील मिनी मार्केटमध्ये संबंधित व्यापारी व नागरिकांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आ. बेनके यांनी ही सूचना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर रायकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष रोहिदास केदारी, मनसे जिल्हाप्रमुख मकरंद पाटे, डी. के. भुजबळ, गणेश वाजगे, अमित बेनके, रामदास अभंग आदी उपस्थित होते.
रस्ता रुंद करायला आमची हरकत नाही. परंतु, कोणाचे पक्के बांधकाम पडणार नाही याबाबतची दखल घेतली जावी, असे वाजगे यांनी सांगितले. आ. बेनके म्हणाले, हा रस्ता राज्यमार्ग असल्याने या कामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खैरे हॉस्पिटल जवळच्या ओढ्यावर पूल बांधण्यात येणार आहे. नारायणगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर रायकर यांनी रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली.
बिले मंजुरीसाठी दबाब
नारायणगाव ग्रामपंचायत जर माझ्याबाबत चुकीची माहिती पसरवीत असेल, तर ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना त्याच्यावर खोटी बिले मंजूर करण्यासाठी कसा दबाव आणला जात होता हे मला नारायणगावच्या जनतेला सांगावे लागेल, असा इशारा नाव न घेता आ. बेनके यांनी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांना दिला.