काळजी घ्या! तरसांचा मोर्चा लोकवस्तीकडे?

काळजी घ्या! तरसांचा मोर्चा लोकवस्तीकडे?
धानोरी : पुढारी वृत्तसेवा : जानेवारीच्या सुरुवातीपासूनच लोहगाव व धानोरी परिसरातील नागरिकांना येथील डोंगराळ भागात वरचेवर तरसांचे दर्शन होत आहे. खंडोबा माळ ते बॉम्बे सॅप्पर्सदरम्यानच्या डोंगर भागात अनेक नागरिकांनी तरस पाहिले असून, त्यांचे व्हिडीओ व फोटो अधूनमधून व्हायरल होत आहेत. तरसांनी लोकवस्तीकडे धाव घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जानेवारी महिन्यात प्राइड वर्ल्ड सिटी येथील रस्त्यावर तरस पाहण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरापूर्वी कलवड येथील काही भाजी विक्रेते चर्‍होली गावात भाजी आणण्यासाठी जात असताना त्यांना पहाटेच्यावेळी पठारे वस्ती रस्त्यावर काही तरस दिसले होते. त्यानंतर भीतीमुळे त्यांनी काही दिवस या रस्त्याने जाण्याचे टाळल्याचे सांगितले. मागील आठवड्यात (दि.3 एप्रिल) धानोरी गावठाणातील वूड्स सोसायटी समोरील रस्त्यावर आलेल्या तरसाचा व्हिडिओ काढण्यात आला होता, असे येथील रहिवासी शिवाजी टिंगरे यांनी सांगितले.
मात्र, कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि नागरिकांचा वावर असल्याने तरसाने तेथून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तक्रार आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी या भागात पाहणी करण्यात आली आहे. तरसांकडून हल्ला करण्याची घटना घडलेली नाही. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करता येत नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी व रात्रीच्यावेळी या भागात जाण्याचे टाळावे.
– सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news