

पुणेः सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याच्या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणारे नशा बार सील केले आहे. तसेच, बार मालक, मॅनेजर, बार काऊंटर, दारू देणार्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांना गुन्ह्यात सह आरोपी केले आहे. यामुळे पुन्हा बार मालकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी पब चालकांवर कारवाई केली होती. तसेच, अल्पवयीन मुलांना दारू न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांमध्ये वाहन तोडफोड, दहशत माजवणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदवत दोन अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली होती. गुन्ह्यात जेजे. अल्पवयीन मुलाचे वडिल धर्मा सरोदे (वय 75), दुसर्या एका मुलाची आई तसेच जे.जे. कायदा कलम 77 नुसार नशा बारचे मालक/चालक, तसेच बार मॅनेजर अनिल विनायक सुर्यवंशी, बार काऊंटर विनोद दत्ता कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी यांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.
दोन दिवसांपुर्वी दोन अल्पवयीन मुलांसह त्याच्या साथीदारांनी हिंगणे खुर्द येथील तुकाईनगरमध्ये ’आम्हीच या भागातील भाई’ म्हणत गोंधळ घालत 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली होती. तर, एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पकडले होते. तर, त्यांचा साथीदार साई पांडुरंग उमाप (वय 18, रा. समर्थनगर) याला अटक केली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर चौघे जण दारू प्यायले असल्याचे समोर आले होते. चौकशीत या तिघांनी वडगाव येथील हॉटेल नशा बारमधून दारू घेतली. त्यानंतर ते दारू प्यायले असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले. त्यानूसार पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माहितीवरून चौकशी केली. नंतर बार मालकांसह, मॅनेजर व दारू देणार्यांना या गुनत आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी मॅनेजर, दारू देणारा व बार काऊंटर यांना अटक केली. तर बार मालक पसार झाला आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे,गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश जायभाये हे तपास करीत आहेत.