पुणे : गुरुवार पेठेतील चार दर्ग्यांनी अतिक्रमण केले असून तत्काळ कारवाई करत येथील आरक्षित जागा महानगरपालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे. या अतिक्रमणांवर तत्काळ कारवाई केली नाही, तर तीव— स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलिस चौकीसमोर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली होती.
टिळेकर म्हणाले, हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही. मात्र, त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमणे आणि त्यातून घडणार्या राष्ट्रविरोधी घटना रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे. या परिसरात महानगरपालिकेचे भाजी मंडईचे आरक्षण आहे. मात्र, 40 वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही व आरक्षित जागा ताब्यात घेत नाही. ही जागा ताब्यात घेऊन येथे नागरिकांसाठी भाजीमंडई उपलब्ध करून द्यावी. महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करतेय, याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तत्काळ कारवाई करण्याची मागणी सुद्धा या वेळी करण्यात आली.