

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित अटल इन्क्युबेशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले कृषिक 2023 हे प्रदर्शन राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देणारे आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. राज्यात इतरत्र अशी प्रदर्शने व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषिकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त रणजित पवार, सुनंदा पवार, विष्णूपंत हिंगणे, राजेंद्र देशपांडे, सीईओ नीलेश नलावडे, केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे आदींची उपस्थिती होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते भल्या सकाळीच प्रदर्शनाची सुरुवात झाली. 170 एकर प्रक्षेत्रावर इलेक्ट्रिक कारमधून त्यांनी फेरफटका मारत पाहणी केली. शेतकर्यांशी देखील त्यांनी संवाद साधला.
राज्यामध्ये गेल्या 30 वर्षांत मी अनेक प्रदर्शने पाहिली. इतर कुठल्याही ठिकाणी पाहिलेल्या प्रदर्शनापेक्षा बारामतीचे कृषी प्रदर्शन हे अत्यंत वेगळे आहे, तेथे जिवंत पिकांचे प्रात्यक्षिक कुठेही नव्हते, असे सांगून सत्तार म्हणाले, या ठिकाणी आल्यानंतर शेतीत नेमके काय करायला हवे, याचा योग्य तो मूलमंत्र शेतकर्यांना मिळेल याच्यावर माझा विश्वास बसला. मराठवाडा आणि विदर्भ या शेतीमध्ये काहीशा मागे असलेल्या भागात शेती सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मी राजेंद्र पवार यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकर्यांनी मोठी गर्दी केली होती.