

काटेवाटी: बारामती तालुक्यातील गावागावात अल्पवयीन मुले दुचाकींवरून फिरताना दिसतात. अशा मुलांवर गावातील पोलिस पाटील लक्ष ठेवून असणार आहेत. या मुलांकडून अपघात होऊ नये, यासाठी बारामती तालुका पोलिस पाटील संघाकडून जनजागृती सुरू केली आहे.
राज्याचे गावकामगार पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष नितीन गटकळ यांनी संघाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये या अनोख्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. (Latest Pune News)
आता पोलिस पाटील थेट दुचाकी फिरवणार्या अल्पवयीन मुलांच्या घरी जात माहिती देत आहेत. ‘काका, तुमचा सोन्या अल्पवयीन हाय. त्याला गाडी देऊ नका. पुन्हा म्हणाल, पोलिस ठाण्यात का कळवलंस. काळजी घ्या,” असा सबुरीचा सल्ला देत आहेत.
या अनोख्या उपक्रमामुळे दुचाकीस्वारावर जरब बसून अपघात रोखण्यासाठी मदत होणार आहे. या उपक्रमामुळे भरधाव सुसाट दुचाकी घेऊन फिरणार्या मुलांना लगाम बसणार आहे. तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवरच थेट कारवाई होणार आहे. त्यामुळे मुलांसह त्यांच्या पालकांवरही एक प्रकारे वचक बसणार आहे.
मुलांवर पोलिस पाटलांचे लक्ष
अल्पवयीन मुले घरातून गाडी घेऊन कॉलेजला जातात किंवा परिसरात मित्रांसोबत फिरताना दिसतात. त्यामुळे गावोगावी सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.
आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी देऊ नका. तसे आढळल्यास पालकांवर थेट गुन्ह्याची कारवाई होते, अशी माहिती देत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गावात कोणता अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत आहे का, यावरही पोलिस पाटलांचे लक्ष राहणार आहे.
दुचाकी चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुले अत्यंत वेगात दुचाकी चालवितात. अपघात झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अपघात होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच अल्पवयीन मुलांच्या हातून अपघात झाल्यास संबंधित मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होतो. यासाठी पालकांना आम्ही सतर्क करणार आहोत.
- सचिन मोरे, पोलिस पाटील, काटेवाडी