

Chicken and egg latest price
मंचर: ऐन आषाढ महिन्यात चिकन आणि अंड्यांचे बाजारभाव गडगडले आहेत. मांसाहार शौकिनांची चिकनखरेदीसाठी गर्दी होत आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी 200 रुपये किलोने मिळणारे चिकन 180 रुपयाने मिळत आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, अवसरी, एकलहरे, कळंब या ठिकाणी मटण, चिकन व मच्छी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी 200 रुपये किलोने मिळणारे चिकन बाजारभाव गडगडल्याने 180 रुपयांनी मिळत असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन एग्ज सेंटरचे विक्रेते आणि घोडेगाव येथील भारत चिकन व होलसेल कोंबडीचे विक्रेते जावेद मिस्त्री व फिरोज मिस्त्री यांनी दिली. (Latest Pune News)
अंड्यांच्या भावात देखील ऐन आषाढात घसरण झाली आहे. अंडी सध्या सात रुपये नग याप्रमाणे 84 रुपये डझन विकली जात आहेत. बकर्याच्या मटणाला मोठी मागणी आहे. मटण किलोला 720 ते 740 रुपये भावाने विकले जात आहे, असे एकलहरे येथील मटण व्यावसायिक शेखर कांबळे व मंचर येथील बाबा मटणचे शारूफ इनामदार यांनी सांगितले.
आषाढ महिन्यात घरगुती देवाचे कोंबडे व बकरे असे कार्यक्रम साजरे केले जातात. आखाड पार्टीचे देखील आयोजन केले जाते. घाऊक बाजारात सध्या गावठी व कावेरी जातीची कोंबडी 500 ते 600 रुपयाला, गावठी कोंबडा 600 ते 800 रुपयाला विकला जात आहे. मासळी बाजारातही कटला, हलवा, पोपट, रहू, चिलापी, वाम या माशांना चांगली मागणी असल्याचे मच्छी व्यावसायिकांनी सांगितले.