

बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत प्लॉटिंगच्या व्यवसायाचे चांगलेच पेव फुटले आहे. बागायती किंवा जिरायती शेती कमी दरात विकत घेऊन जमिनीत रस्ते, ड्रेनेज, कंपाउंड करून जाहिरातबाजी करून बेकायदा प्लॉटिंग विकले जात आहे. यामध्ये एजंटांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने फसवणुकीची दाट शक्यता आहे.
गेल्या कित्येक वर्षांत बारामतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे जमिनींना चांगले दर आले आहेत. शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा प्लॉटिंग केले जात आहे. बेकायदा प्लॉटिंगमध्ये जमीन घेऊन त्यावर अनधिकृत घरे बांधली जात आहेत. परिणामी, अनधिकृत घरांचाही प्रश्न उभा ठाकला आहे. यातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने बारामतीकर तसेच इतर तालुक्यातील नागरिकांनी शेती जमिनींची पूर्ण माहिती घेऊनच ती खरेदी करावी अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शहरात घरे घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने नागरिकांचा अशा प्लॉटिंगमध्ये दोन-तीन गुंठ्यांचे क्षेत्र घेण्याकडे कल असतो. बेकायदेशीर प्लॉटिंग करणारे छोटे-छोटे प्लॉट पाडून, ते गरजूंना विकतात. त्यांचे ना ’एनए’ केलेले असते, ना कुठली शासकीय परवानगी घेतलेली असते, त्यामुळे गुंठेवारी वसाहती वाढत आहेत.
बारामती शहरात असलेली शिक्षणाची चांगली सोय, उपलब्ध सुविधा, औद्योगिकरण, नोकरीनिमित्त स्थायिक झालेले नागरिक, बँका आणि फायनान्स कंपनीचे जाळे, विविध प्रकारच्या वाहनांची शोरूम, दर्जेदार असलेली रुग्णालये यामुळे पुण्यानंतर सर्वाधिक विकसित होणारे शहर म्हणून बारामतीची ओळख आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच स्वतःचे छोटे का होईना घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे अनेक जमिनीचे खरेदी-विक्री करणार्या एजंटांकडे ग्राहक आकर्षित होतात. काही एजंट ग्राहकांना चांगली सेवा देतात, तसेच प्लॉटिंगबाबत पूर्ण माहिती देतात मात्र काहींचा उद्देश मात्र निव्वळ टोप्या टाकण्याचा असल्याचेही काही उदाहरणावरून समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सखोल माहिती घेणे गरजेचे बनले आहे.
काही व्यावसायिक बेकायदा जमिनीवर रस्ते, ड्रेनेज कंपाउंड आणि सुलभ हप्त्यांची सोय करून ग्राहकांना विविध सुविधांचे आमिष दाखवून आकर्षित करतात. अशा बेकायदेशीर प्लॉटिंगमुळे कायदेशीर जमीन विक्री करणार्या व्यावसायिकांचा व्यवसाय अडचणीत येत आहे. बेकायदा प्लॉटिंगचे हेच पेव एंजट आता गावोगावी करू लागले आहेत. विशेषत: राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग झाले आहे, त्यामुळे भविष्यात शेतीसाठी जमीन कमी पडणार आहे.