

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपरिषदेचा घनकचरा निंबोडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकण्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. येथे घनकचरा टाकणे बंद न केल्यास मंगळवार (दि. 6) पासून निंबोडी ग्रामस्थ बारामती नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. याबाबत निंबोडी ग्रामपंचायतीच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले आहे.
निंबोडी येथे 1972 च्या दुष्काळामध्ये पाझर तलाव बांधण्यात आला असून या तलावासाठी 35 एकर क्षेत्र शासनाने संपादित केले आहे. येथील संपादित जमिनीवर अतिक्रमण करून प्लास्टिकमिश्रित ओला कचरा, मेडिकल वेस्टेज कचरा, पाझर तलावाजवळ टाकण्यात येत आहे. या पाझर तलावाखाली असणा-या ओढ्यात लाकडी, निंबोडी, सणसर या गावांना पाणीपुरवठा करणार्या विहिरी आहेत. या विहिरींमध्ये कच-याचे दूषित पाणी पाझरून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पाझर तलावालगत टाकण्यात येणारा कचरा त्वरित बंद करण्यात यावा, बारामती नगरपरिषदेचा घनकचरा निंबोडी गावच्या हद्दीत टाकू नये यासाठी दि. 10 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले होते. निवेदन देऊनही या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
या ठिकाणी टाकण्यात येणार्या घनकच-या मुळे फुरसुंगीसारखी अवस्था निंबोडी गावची होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी जागरुक होण्याची गरज आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या वेळी निंबोडीचे सरपंच सचिन भोईटे, उपसरपंच हनुमंत घोळवे, अमोल घोळवे, दिलीप घोळवे, बाळासाहेब घोळवे, झुंंबर खाडे, कुंडलिक घोळवे, मनोज घोळवे, लाकडीचे सरपंच महेश वणवे आदी उपस्थित होते.