

बारामती: जिल्ह्यात मंगळवारी (दि. ८) बारामती आणि लोणी काळभोर अशा दोन ठिकाणी एसीबीने लाच प्रकरणी पोलिस दलातील दोघांना अटक केली. पोलिस प्रशासनातील वारंवार उघडकीस येणाऱ्या लाचखोरीच्या प्रकारांमुळे 'खाकी'तील लाचखोरीला लगाम कधी लागणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
बारामतीत हवालदाराने तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कारवाई टाळण्यासाठी सात लाखांची मागणी केली. दोन लाख रुपये स्वीकारल्यावर उर्वरित पाच लाख स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले गेले. दुसरीकडे लोणी काळभोरमध्ये सहायक पोलिस निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. यानिमित्ताने खाकीतील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
विशेष म्हणजे एकीकडे ५० हजार रुपये स्वीकारताना सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांना पकडले जाते. दुसरीकडे बारामतीत अगोदर दोन लाख रुपये स्वीकारल्यानंतरही महेश उगले या हवालदाराची भूक भागत नाही. उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारताना त्याला अटक होते. यातून लोणी काळभोरपेक्षा बारामतीचा भाव वधारलेला दिसून येत असल्याची उपहासात्मक टीका आता नागरिक करू लागले आहेत.
बारामतीत लाचखोरीत पकडल्या गेलेल्या महेश उगले हा मंगळवारपासून ट्रेडिंगमध्ये आला आहे. त्याचे यापूर्वीचे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 'वाघाला हरवण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिले... पण शेवटी शिकारी बदलले, वाघ कधीच नाही' ही रिल्स तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, उगले यांनी यापूर्वी भिगवण, जेजुरी येथे काम करतानाही या पद्धतीचे काही प्रकार केले आहेत का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
बारामतीसाठी धोक्याची घंटा
सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या पोलिस दलातील एका हवालदाराने तब्बल सात लाख रुपयांची लाच मागण्यापर्यंत मजल मारत असल्याने बारामतीसाठी ती धोक्याची घंटा आहे. तालुका पोलिस ठाण्यात गतवर्षीच एका महिला अंमलदारावर लाचप्रकरणी कारवाई झाली होती. या प्रकरणांनी पोलिस यंत्रणेतील अंतर्गत नियंत्रण, वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि खाकीचा धाक दाखवून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
वरिष्ठांंचा वचक महत्त्वाचा
पोलिस दलात काही अधिकारी- कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. परंतु काही कर्मचाऱ्यांच्या गैरकृत्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत, कर्मचाऱ्यांकडून घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर प्रभारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे गरजेचे बनले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाचखोरांवर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
दोषसिद्धीचे अत्यल्प प्रमाण कारणीभूत
लाच प्रकरणात दोषसिद्धीचे अत्यल्प प्रमाण लाचखोरीला कारणीभूत ठरते आहे. पोलिस दलात लाच प्रकरणात कारवाई झाली, तर ५० टक्के पगारात काही दिवस मुख्यालयात काढावे लागतात. त्यानंतर पुन्हा नवीन पोलिस ठाणे मिळते. दोषारोपपत्र दाखल होणे, निकाल लागणे या प्रक्रियाही अनेक वर्षे चालतात. परिणामी, कायद्याचे रक्षक असणाऱ्यांनाच कायद्याचा धाक उरत नाही, अशी स्थिती