बारामती शहर पोलिसांकडून चार अल्पवयीन मुलींचा तत्काळ शोध

बारामती शहर पोलिसांकडून चार अल्पवयीन मुलींचा तत्काळ शोध

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती शहरातील एका विद्यालयातून चार अल्पवयीन मुली बुधवारी (दि. 7) अचानक बेपत्ता झाल्या. विद्यालयातून या मुली घरी न आल्याने पालक चिंताग्रस्त झाले. रात्री 9 वाजता पालकांनी शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अवघ्या काही तासांतच या मुलींचा शोध घेत त्यांना पालकांकडे सुपूर्त केले. 13 ते 15 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुली शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेतात. बुधवारी त्या नेहमीप्रमाणे घरातून विद्यालयात गेल्या. परंतु विद्यालय सुटल्यानंतर त्या घरी गेल्या नाही. पालकांनी त्यांची वाट बघितली. त्यानंतर त्यांचा शोध सुरु केला. कुठेही त्यांचा पत्ता लागत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले. अखेर रात्री 9 वाजता त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत लागलीच हालचाल सुरु केली.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या मुली पुणे स्टेशन परिसरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच पुणे शहरात बंडगार्डन पोलिसांशी संपर्क साधला. बंडगार्डन पोलिसांनी तेथे मदत करत रात्री 10 वाजता या मुलींना पुणे स्टेशनवरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बारामतीला आणत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. गायब झालेल्या मुलींचा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोध लावल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. ही कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत पाडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके, अमंलदार श्रीकांत गोसावी, बापू इंगोले आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news