

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. समितीने शेतकर्यांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या असून, राज्यात स्मार्ट समिती म्हणून बारामतीचा नावलौकिक असल्याची माहिती समितीचे सभापती सुनील पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा 88 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी नगराध्यक्ष जवाहर शाह-वाघोलीकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रय आवाळे, देखरेख संघाचे अध्यक्ष अनिल आटोळे, दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, व्यापारी संघटनेचे संभाजी किर्वे, भाजी मार्केट व्यापारी अध्यक्ष सईद बागवान, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, व्यापारी सेल अध्यक्ष वैभव शिंदे, हमाल मापाडी संघटनेचे उपाध्यक्ष शंकर सरक आदींची उपस्थिती होती.
पवार म्हणाले, समितीची सुरुवात कॉटन मार्केट म्हणून झाली होती. समितीचे मुख्य बाजार आवार, सुपे व जळोची येथे उपबाजार आवार असा विस्तार वाढला. समितीच्या मुख्य यार्डात रेशीम मार्केट सुरू असून, रेशीम कोष लिलाव ई-नाम ऑनलाइन पध्दतीने राबविणारे बारामती हे राज्यात पहिले मार्केट आहे. त्यासाठी रेशीम कोष खरेदी-विक्री मार्केट व प्रशिक्षण केंद्र प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जळोची उपबाजार येथे नवीन निर्यात सुविधा केंद्र व कार्यालय इमारत कामे सुरू आहेत. सुपे येथे नवीन जागेत विविध उपक्रम व सुविधा राबविण्यात येणार असून, यापुढेदेखील शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी भविष्यात सोयी-सुविधा पुरविण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहील.
बाजार समितीने दुरदृष्टी ठेवल्यानेच समितीची वाटचाल ही प्रगतिपथावर आहे. समितीने शेतकऱ्यांचे हिताचे काम करीत राहावे, असे मत संभाजी होळकर यांनी व्यक्त केले. समितीने आवारात ऊस उत्पादकांसाठी ऊस रोपांची नर्सरी तयार करून उच्च दर्जाची रोपे उपलब्ध करून द्यावीत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत शेतमालास योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अॅड. जगताप यांनी केले.
जवाहर शाह-वाघोलीकर, सूर्यकांत गादिया यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाजार समितीची प्रगती ही शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व इतर बाजार घटक यांचे सहकार्याने सुरू आहे. बाजार आवारात विविध सुविधा व उपक्रम सुरू असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. उपसभापती नीलेश लडकत, सचिव अरविंद जगताप व संचालक मंडळाने स्वागत केले. युवराज देवकाते, विनायक गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश जगताप यांनी आभार मानले.