बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती एमआयडीसीतील विद्या कॉर्नर येथील कॅफे ग्राउंड अपवर पोलिसांनी कारवाई केली. या वेळी कॅफेमधील पडदे लावून पार्टिशन केलेल्या जागेत अल्पवयीन महाविद्यालयीन मुले-मुली बसून अश्लील चाळे करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित कॅफेचालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. कॅफेमालक सुहास तानाजी कदम व व्यवस्थापक मयूर बाळू कदम, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी याबाबत माहिती दिली. बारामतीमधील एमआयडीसी चौक परिसरात अनेक सायबर कॅफे सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये महाविद्यालयीन मुला-मुलींना निवांतपणे गप्पा मारता येतील, असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कॅफेत जाण्याकडे अल्पवयीन तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. त्यामुळे संबंधित कॅफेचालकांवर कारवाई व्हावी, अशी नागरिकांमधून चर्चा होत होती. अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिसांसह निर्भया पथकाने ही कारवाई केली.
पालकांनी आपल्या पाल्यांबाबतीत गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. संबंधित सर्व कॅफेचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यांनी कॅफेमधील पार्टिशन काढून नाही टाकले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित कॅफेचालकाचे परवाने रद्द करण्याबाबतचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.
– प्रभाकर मोरे, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे