

पुणे: बारामती विमानतळावरील अपघातामुळे खासगी विमान कंपन्यांच्या क्रू क्षमता, प्रशिक्षण, देखभाल आणि चार्टर ऑपरेशन्सच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.
टेबलटॉप रनवे असलेल्या बारामती विमानतळावर लँडिंग करताना अपघात होऊन लागलेल्या आगीत विमान नष्ट होऊन विमानातील सर्वांचा मृत्यू होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संभाव्य कारणांमध्ये खराब दृश्यमानता व अशा दृश्यमानतेत विमान उतरवण्याचा वैमानिकाचा चुकलेला निर्णय, लँडिंग करताना त्यांचा अंदाज चुकणे, विमानाच्या नियंत्रणातील त्रुटी, विमानात झालेला यांत्रिक बिघाड, क्रू फटिग चा निर्णय क्षमतेवर परिणाम या सारख्या व इतर अनेक कारणांचा समावेश असू शकतो. या विमानाचे ऑपरेटर व्हीएसआर एव्हिएशन असून, 2023 मध्ये याच कंपनीच्या दुसऱ्या लिअरजेटचा मुंबईत अपघात झाला होता, असेही हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले.
अपघाताच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी हवाई अपघातांची चौकशी करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारच्या एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. त्यांचा अंतिम अहवाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे अनुमान काढणे किंवा कोणावर दोषारोपण चुकीचे होईल व तसे करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. असे अंदाज चुकीची माहिती पसरवतात, त्यांचा पीडितांच्या कुटुंबीयांना अतिरिक्त त्रास होऊ शकतो, हवाई वाहतुकीच्या विश्वासाहर्तेवर परिणाम करण्याबरोबरच चौकशी प्रक्रियेत अडथळे निर्माण करू शकतात.
विमानतळावरील पायाभूत सुविधा सक्षमीकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना देशात अशा दुर्घटना घडणे या क्षेत्रासाठी हानिकारक आहे. या दुर्घटनेतून सरकारने गंभीर धडे घ्यावयास हवेत. बारामती व त्यासारख्या देशातील इतर प्रादेशिक आणि अनियंत्रित विमानतळांवर हवाई वाहतुकीची सुरक्षितता राखण्यासाठी रनवे सुरक्षा क्षेत्र, नेविगेशनल एड्स, हवामान निरीक्षण उपकरणे व प्रणाली, आपत्कालीन अग्निशामन, रेस्क्यू सुविधा व इतर आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावयास हवीत.
चार्टर आणि नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्सवर उड्डाणांसाठी कडक निरीक्षण, नियमित ऑडिट, क्रू फटिग मॅनेजमेंट आणि सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण अधिक सक्त होणे गरजेचे आहे. डीजीसीए मधील तज्ञ कर्मचाऱ्यांची संख्या, तांत्रिक क्षमता आणि स्वायत्तता वाढवण्याची अनेक दिवसांपासून मोठी गरज आहे.