इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ आता भाजप युवा मोर्चच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असा उल्लेख केलेला बॅनर्स झळकले आहेत. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. अंकिता पाटील- ठाकरे या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा असल्याने जिल्ह्यात जागोजागी कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत आहेत.
इंदापुरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचसमोर अंकिता पाटील ठाकरे यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स लावला आहे. कार्यकर्त्यांनी लावलेला इंदापूर महाविद्यालयासमोरील बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून या बॅनर वरती "भावी खासदार' असा उल्लेख करण्यात आला आहे. याच बॅनरची आता सर्वत्र चर्चा चालू आहे. अंकिता पाटील या माजी सहकारमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत, तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव ॲड. निहार ठाकरे यांच्या पत्नी आहेत. नुकतीच त्यांची पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंकिता पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही भूषवलं आहे.
सध्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा हे अभियान राबवत आहेत. तसेच ग्रामीण भागातील युवकांचे आणि महिलांचे प्रश्न सरकारपुढे मांडत आहेत. त्यांचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यांच्याकडे अनेक दिवसांपासून भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्याच अनुषंगाने आज इंदापूरमधील लागलेला तो बॅनर एक राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा