

राजेंद्र कवडे-देशमुख
बावडा : केळी उत्पादक शेतकर्यांना जागेवरच प्रतिकिलोस सरासरी 24 ते 27.50 रुपये एवढा उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे सध्या केळी उत्पादक शेतकर्यांमध्ये खुशीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. सध्या बावडा भागातून केळीची इराण, सौदी अरेबिया या देशांमध्ये निर्यात सुरू आहे. कचरवाडी (बावडा) येथील कृषी पदवीधर शेतकरी अमर किसन फडतरे यांच्या केळीस 27.50 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला आहे. त्यांची 7 एकर केळी बाग असून एक महिन्यापासून त्यांच्या केळीची काढणी चालू आहे.
आजपर्यंत 105 टन केळीची निर्यात झाली असून, एकूण सुमारे 150 टन केळीची निर्यात होईल, असे अमर फडतरे यांनी सांगितले. माझ्या केळी पिकापासून यापेक्षाही अधिकचे उत्पादन निघाले असते; मात्र बागेतील केळीची शेकडो झाडे व्हायरसमुळे नष्ट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
केळी बागेचे त्यांनी आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन केल्याने एका घडाचे वजन सरासरी 30 ते 35 किलो भरत आहे. सध्या बागेतच घड स्वच्छ करून ते बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून कुलिंग व्हॅनमधून इराण, सौदी अरेबिया या देशात निर्यात सुरू असून, आणखी सुमारे एक महिना बागेतील केळीची निर्यात सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या कटू आठवणी पडद्याआड!
कोरोनाच्या काळात काढणीस आलेल्या केळी शेतकर्यांना सोडून द्याव्या लागल्या. त्यामुळे एका-एका शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. आता मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जवळपास संपुष्टात आल्याने केळी पिकास उच्चांकी भाव मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या कटू आठवणी पडद्याआड झाल्याचे समाधानाकारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.