जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवालयाची बाळूमामा पालखी गेल्या 15 दिवसांपासून पुरंदर तालुक्यात मुक्कामी आहे. पालखी आणि मामांच्या मेंढ्यांच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठी गर्दी करीत आहेत. मामांच्या मेंढ्या आपापल्या गावात आणण्यासाठी गावनेत्यांची रांग लागली आहे. दरम्यान, रविवारी (दि. 25) साकुर्डे ग्रामस्थांनी पालखीचे भंडारा उधळून स्वागत केले.
श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्टचे कारभारी बापू हातनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळूमामांची सुमारे अडीच हजार मेंढ्या आणि पालखीसोबत शंभरावर सेवेकरी 15 दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यात दाखल झाले आहेत. पांडेश्वर, नाझरे, धालेवाडी, भोसलेवाडी, बेलसर या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. रविवारी साकुर्डे येथे पालखी सोहळा आणि बकर्यांचे आगमन झाले. साकुर्डेकरांनी त्यांना भक्तिभावाने निमंत्रण दिले होते.
साकुर्डे शीवेवर आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे भंडार, गुलाल उधळून स्वागत केले. साकुर्डे गावचे सरपंच अजित जाधव, विकास सोसायटीचे अध्यक्ष विशाल चव्हाण, सदस्य मोहन जाधव, राजेंद्र सस्ते, राजेंद्र जाधव आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. मुख्य रस्त्याने गावात जाऊन या सोहळ्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर साकुर्डे शिवारात मुक्काम ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी आरती, महाप्रसाद, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी सोहळ्याचा तीन दिवस मुक्काम असल्याने परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनाला येत आहेत.
बाळूमामांच्या मेंढ्यांनी आपल्या शेतात पायधूळ झाडावी म्हणून भाविक आग्रह करीत आहेत. तीन दिवस मुक्काम असल्याने सोहळ्याचा संपूर्ण खर्च ग्रामस्थ कांतीलाल भोंगळे, वामन सस्ते, सूरज चव्हाण, राहुल सस्ते, गणेश सस्ते, बबलू पवार, दत्तात्रय जाधव, संग्राम जाधव संदीप सस्ते आदी करीत आहेत.